रांगोळी स्पर्धेतून सामाजिक संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 10:26 PM2020-01-02T22:26:14+5:302020-01-02T22:26:39+5:30
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या येथील भिकुसा हायस्कूलमध्ये रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेऊन रांगोळीच्या रंगात न्हाऊन निघाल्याचे चित्र दिसून आले.
सिन्नर : गोखले एज्युकेशन सोसायटीच्या येथील भिकुसा हायस्कूलमध्ये रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेऊन रांगोळीच्या रंगात न्हाऊन निघाल्याचे चित्र दिसून आले.
या रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख व मुख्याध्यापक सुरेश शिरसाट यांनी केले. स्पर्धेचे परीक्षण मीना ढमाले आणि अंजली वर्पे यांनी केले. एस. बी. देशमुख यांनी विद्यार्थ्यांचे तोंड भरून कौतुक केले व त्यांच्या कार्याबद्दल त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.
विविधरंगी रांगोळ्यांमधून विद्यार्थ्यांनी पाणी वाचवा, जंगल वाचवा यांसारखे सामाजिक संदेश दिले. नववर्ष स्वागतासाठीच्या रांगोळ्या अतिशय आकर्षक होत्या. या रांगोळी स्पर्धेत लहान गटातून प्रथम रेणुका ज्ञानोबा शिंदे व मयुरी उत्तम दवंडे, द्वितीय आरती संतोष वायाळ, तृतीय ज्ञानेश्वर साबळे, रोहित चव्हाण व आरती चौरे व उत्तेजनार्थ नंदिनी सोनवणे, मयुरी दळवी, देवयानी घरटे आदींनी मान मिळविला. मोठ्या गटातून प्रथम स्नेहल बिंदर, द्वितीय नेहा निकाळजे, तृतीय अनुष्का लोंढे, उत्तेजनार्थ साक्षी रानडे आदींनी मान मिळविला. शाळेचे मुख्याध्यापक एस. बी. शिरसाट यांच्या कल्पनेतून साकारलेली ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रभाकर बोडके, वैभव चंदे, जयवंत महाले, रामनाथ जाधव, जयश्री सांगळे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
पाणी अडवा-पाणी जिरवा यांची देखावे
या स्पर्धेत इयत्ता पाचवी ते सातवी या लहान गटातील विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर २८ रांगोळ्यांमधून देशभक्त, क्रांतिकारक, संस्कार भारती, निसर्गचित्र, नववर्षाच्या शुभेच्छा, बेटी बचाव-बेटी पढाव, स्वच्छ भारत अभियान, पाणी वाचवा आदी अनमोल संदेश देऊन परीक्षकांची मने जिंकली. आठवी ते दहावी या मोठ्या गटातील विद्यार्थ्यांनी १९ रांगोळ्यांमधून निसर्ग देखावा, पाणी अडवा-पाणी जिरवा, बेटी बचाव, स्वच्छता अभियान, क्रांतिकारक, देशभक्त यांचे देखावे रेखाटले.