सामाजिक संदेश देणाऱ्या डायरींना पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 12:17 AM2018-12-23T00:17:36+5:302018-12-23T00:18:03+5:30
आजच्या आधुनिक डिजिटल युगातही डायरीचे महत्त्व कायम असून, नवीन वर्षापासून हिशेबासह विविध प्रकारच्या कामांसाठी डायरी व्यापारी व ग्राहकांना लागतात.
नाशिक : आजच्या आधुनिक डिजिटल युगातही डायरीचे महत्त्व कायम असून, नवीन वर्षापासून हिशेबासह विविध प्रकारच्या कामांसाठी डायरी व्यापारी व ग्राहकांना लागतात. नवीन वर्ष अवघ्या आठ दिवसांवर आल्यामुळे वर्षभराच्या नियोजनासाठी लागणाºया २०१९च्या नवीन वर्षाच्या डायºया बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत. शहरातील मेनरोडवरील विविध दुकानांपुढे डायरींचे स्टॉल मांडलेले दिसून येत आहेत. तसेच स्टेशनरी, गिफ्ट शॉपी अशा विविध दुकानांमध्ये डायरी खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी दिसत आहे. आजच्या आधुनिक युगात संगणक, मोबाइल, टॅब, लपटॉप ही माहिती साठवण्यासाठी असलेली आधुनिक यंत्रे उपलब्ध असले तरीदेखील लोकांनी डायरीचा वापर करणे सोडलेले नाही.
आज आधुनिक यंत्रे उपलब्ध असतानादेखील अनेक कंपन्या, सरकारी आणि खासगी कार्यालय, उद्योजक, व्यापारी, लेखक, पत्रकार, शिक्षक, विद्यार्थी, गृहिणी आणि वृद्ध आदी नागरिक आपल्या रोजच्या नियोजन व दैनंदिन व्यवहाराची नोंद ठेवण्यासाठी डायरीचा उपयोग करतात, तर काही नवीन वर्षाचे संकल्प लिहिण्यासाठी डायरीचा उपयोग करीत असल्यामुळे आजच्या डिजिटल युगातही डायरीचे महत्त्व कायम आहे.
सध्या बाजारपेठेत २०१९ या नवीन वर्षाच्या डायरी विक्रीसाठी दाखल झाल्या असून, त्यामध्ये विविध प्रकार आहेत. पॉकेट डायरी, न्यू इयर डायरी, इंजिनिअरिंग डायरी, आॅर्गोनायझर डायरी, एक्झिक्युटिव्ह डायरी, प्लॅनर डायरी, स्पायरल डायरी, लेदर डायरी, दिनविशेष डायरी, कार्पोरेट डायरी, कार्डबोर्ड डायरी, टेलिफोन डायरी, संतांची महती सांगणारी डायरी, लॉक डायरी, दैनंदिनी लिहिण्यासाठी डायरी आदी प्रकारच्या डायºया विक्रीसाठी बाजारपेठेत उपलब्ध असून, डायरींची किंमत दहा रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंत आहेत.
डायरींमध्ये अनेक व्यक्तींनी केलेल्या कामगिरीची माहिती देण्यात आली आहे. छायाचित्र आणि त्यांनी केलेल्या कार्याची माहितीदेखील आहे. याचबरोबर सामाजिक आणि पर्यावरणविषयक सामाजिक संदेश देण्यात आले आहेत. स्त्रीभ्रूण हत्येमुळे दिवसेंदिवस मुलींच्या जन्माचे प्रमाण घटत आहे. आम्हाला माहीत आहे, तरी आपण मुलींची हत्या का करीत आहोत. झाडे तोडून पर्यावरणाची हानी होत आहे. तरी आपण का झाडे तोडत आहोत? अशा प्रकारचे सामाजिक प्रश्न उपस्थित करून डायरींच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
बºयाचदा नवीन वर्षाची भेटवस्तू म्हणून डायरी दिली जाते. आकार, डिझाइन, रंग, पानावरची रचना, मजकूर याचा विचार करून भेटवस्तू देण्यासाठी खास आकर्षक डायरी बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत. तसेच विशिष्ट विषयासंदर्भात मजकूर, सुविचार असलेल्या डायºयाही भेटवस्तू म्हणून दिल्या जातात.
वर्षभर डायरींना मागणी असते, पण नववर्षानिमित्त खास आकर्षक डायरींना मागणी असते. यातही कार्डबोर्ड, कार्पोरेट डायरींचा खप अधिक असतो. भेटवस्तू देण्यासाठीसुद्धा डायरींचा उपयोग होतो. त्यामुळे विशिष्ट मजकूर, डिझाइन असलेल्या डायरींनाही विशेष मागणी असते. - सुनीता सावंत, विक्रेता
नवीन वर्ष काही दिवसांवर आल्यामुळे अनेक कंपन्या, नागरिक आपल्या रोजच्या दैनंदिन व्यवहार नोंदीसाठी डायरीचा उपयोग करीत असतात. यामुळे २०१९ या नवीन वर्षाच्या डायरींची खरेदी करण्यासाठी गर्दी करीत आहेत. यंदाच्या वर्षी काही डायरींमध्ये बेटी बचाव... बेटी पढाव... सामाजिक संदेश आणि पर्यावरणाविषयी संदेशदेखील देण्यात आले आहेत. अशा डायरींना नागरिक अधिक पसंती देत आहेत. - संजय बागुल, विक्रेता
नवीन वर्षाचे संकल्प लिहिण्यासाठी आणि रोजची दैनंदिनी व हिशोब लिहिण्यासाठी आम्ही यंदा नवीन डिझाइनच्या डायरींची खरेदी करत आहोत. - गौरी जोशी, ग्राहक