निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाज संघटन
By admin | Published: October 18, 2016 02:49 AM2016-10-18T02:49:25+5:302016-10-18T02:50:25+5:30
मेळाव्यांची तयारी : मराठा मूकमोर्चांनी दिली प्रेरणा
नाशिक : राज्यभरात ठिकठिकाणी सुरू असलेल्या मराठा समाजाच्या मूकमोर्चांची प्रेरणा घेत आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अन्य समाजही संघटित होऊ पाहत असून, समाज मेळाव्यांची तयारी केली जात आहे. येत्या २५ आॅक्टोबरला बलुतेदार-अलुतेदार समाज संघटनेने मेळाव्याचे आयोजन करत निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत दिले आहेत.
गेल्या ९ आॅगस्टपासून राज्यभरातील विविध शहरांमध्ये आपल्या विविध मागण्यांसाठी मराठा समाजाच्या वतीने विराट मूकमोर्चे काढले जात आहेत. अतिशय शिस्तबद्ध व नियोजनबद्ध निघणाऱ्या या मूकमोर्चांनी आंदोलनाचा एक नवा अध्याय सुरू केला असतानाच त्यातून समाजाचे संघटनही घडून येत आहे. मूकमोर्चाच्या माध्यमातून मराठा समाज एकवटला आहे. त्याचीच प्रेरणा घेत आता वेगवेगळे समाजघटकही एका झेंड्याखाली एकत्र येऊ पाहत आहे.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या समाजालाही स्थान मिळावे, समाजातील उपेक्षितांना न्याय मिळावा, सत्तेच्या मुख्य प्रवाहात येत प्रलंबित प्रश्न मार्गी लागावेत, यासाठी छोट्या-मोठ्या समाजघटकांकडून एकत्र येण्याची तयारी केली जात आहे. त्यासाठी प्राथमिक बैठकाही सुरू झाल्या असून, त्यात समाज बांधवांची खानेसुमारी करण्यावर भर दिला जात आहे.
बलुतेदार-अलुतेदारांच्या संघटनेनेही आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर समाज संघटनावर लक्ष केंद्रित केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून येत्या २५ आॅक्टोबरला दुपारी ४ वाजता कॅनडा कॉर्नरवरील वसंत मार्केटमधील श्री समर्थ मंगल कार्यालयात पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला आहे. (प्रतिनिधी)