सामाजिक शक्ती इतिहासनिर्मिती करते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:12 AM2020-12-26T04:12:57+5:302020-12-26T04:12:57+5:30

नाशिक : सामाजिक शक्ती उभी करण्याचे काम महापुरुष करीत असतात. अशा महापुरुषांच्या पाठीशी उभी राहणारी सामाजिक शक्ती ही इतिहासाची ...

Social power makes history | सामाजिक शक्ती इतिहासनिर्मिती करते

सामाजिक शक्ती इतिहासनिर्मिती करते

Next

नाशिक : सामाजिक शक्ती उभी करण्याचे काम महापुरुष करीत असतात. अशा महापुरुषांच्या पाठीशी उभी राहणारी सामाजिक शक्ती ही इतिहासाची निर्मिती करते. हीच सामाजिक शक्ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशीही उभी राहिल्याने बाबासाहेब इतिहासाचे निर्माते झाल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक तथा विचावंत रावसाहेब कसबे यांनी केले आहे.

परिवर्तन परिवार बहुद्देशीय संस्थेतर्फे शुक्रवारी (दि.२५) रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालयात प्रा. गंगाधर अहिरे लिखित ‘वादळाचे शिलेदार’ या व्यक्तिचित्रण ग्रंथाचे ज्येष्ठ समीक्षक डॉ. ऋषिकेश कांबळे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ते करुणासागर पगारे, भाषा अभ्यासक देवेंद्र उबाळे, प्रा. साधना देशमुख, प्रतिभा अहिरे आदी उपस्थित होते. रावसाहेब कसबे म्हणाले, जो महापुरुष वर्तमानकाळात हस्तक्षेप करतो, त्याचा इतिहास होतो. अशा महापुरुषांच्या चळवळीतील त्यांचे अनुयायी इतिहासाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देत असतात. धुरिणांचा जीवनलेख लेखकाने शब्दबध्द केला असून इतिहासकार आणि संशोधकांपुढे या पुस्तकाने एक आव्हान निर्माण केल्याचे त्यांनी नमूद केले. तर हा ग्रंथ म्हणजे निवडक प्रतिक्रांतिवाद्यांना थोपविणाऱ्या क्रांतिवाद्यांची शौर्यगाथा असल्याचे डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी अधोरेखित केले. इतिहास कसा घडतो हे जाणून घेण्यासाठी सामान्य धुरिणांची साधारचरित्रांचा व व्यक्तिचित्रणांचा अभ्यासकांना उपयोग होत असतो. त्यासंदर्भाने विविध विचारवंताचे दाखले देऊन, सामान्य कार्यकर्त्याचा इतिहास घडविण्यातील योगदान ग्रंथांच्या केंद्रस्थानी असल्याचे निरीक्षण देवेंद्र उबाळे यांनी नोंदविले. दरम्यान, प्रा. गंगाधर अहिरे यांनी ग्रंथनिर्मितीमागील भूमिका मांडतानाच आगामी काळात अनेक अलक्षित धुरिणांचा इतिहास संशोधनाच्या बाण्याने शब्दबध्द करण्याचा मनोदय व्यक्त केला. प्रास्ताविक करुणासागर पगारे यांनी केले. सूत्रसंचालन रोहित गांगुर्डे व नितीन भुजबळ यांनी केले. डॉ. धीरज झाल्टे यांनी आभार मानले. यावेळी .परिवर्त परिवाराचे नीतीन बागूल, किशोर शिंदे, वैशाली रणदिवे, कवी काशीनाथ वेलदोडे, राजेद्र मोकळ, महेंद्र रणदिवे आदी उपस्थित होते.

(फोटो -२५ बूक पब्लिश)- प्रा. गंगाधर अहिरे लिखित वादळाचे शिलेदार पुस्तकाचे प्रकाशन करताना ज्येष्ठ समीक्षक डॉ. ऋषिकेश कांबळे. समवेत करुणासागर पगारे, प्रा. गंगाधर अहिरे, डॉ. रावसाहेब कसबे, प्रा. साधना देशमुख, प्रतिभा अहिरे व देवेंद्र उबाळे आदी.

Web Title: Social power makes history

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.