मुंढे यांच्यावरून सोशल वॉर ; वॉक फॉर कमिशनर उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 01:39 AM2018-08-30T01:39:02+5:302018-08-30T01:39:22+5:30
आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावरील अविश्वास ठरावाला विरोध करण्यासाठी त्यांचे समर्थक शुक्रवारी (दि.३१) वॉक फॉर कमिशनर उपक्रम राबवून जनजागृती करणार आहे. दुसरीकडे सोशल मीडियावर मुंढे विरोधकांनीदेखील वेगवेगळ्या पोस्ट टाकण्यात आल्याने त्याचे खंडण-मंडणाने सोशल मीडियावर वॉर सुरू झाले असून दोन दिवस हेच काम करण्यात येणार आहे.
नाशिक : आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावरील अविश्वास ठरावाला विरोध करण्यासाठी त्यांचे समर्थक शुक्रवारी (दि.३१) वॉक फॉर कमिशनर उपक्रम राबवून जनजागृती करणार आहे. दुसरीकडे सोशल मीडियावर मुंढे विरोधकांनीदेखील वेगवेगळ्या पोस्ट टाकण्यात आल्याने त्याचे खंडण-मंडणाने सोशल मीडियावर वॉर सुरू झाले असून दोन दिवस हेच काम करण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात भाजपाच्या पुढाकाराने सर्वपक्षीयांनी अविश्वास ठराव दाखल केला असून त्यासाठी करवाढीचा मुद्दा पुढे केल्याचे मुंढे समर्थकांचे म्हणणे आहे त्यामुळे सोमवारी (दि.२७) अविश्वास ठराव दाखल झाल्यानंतर वुई सपोर्ट तुकाराम मुंढे अशी चळवळच सुरू झाली आहे. समर्थकांनी अनेक व्हॉट्सअॅपचे ग्रुप तयार करून आयुक्त मुंढे यांनी नाशिककरांच्या हिताचे घेतलेले निर्णय तसेच नगरसेवक नेमके दुखावले जात आहेत याबाबत जोरदार प्रचार सुरू आहे.
शहरात अडीचशे कोटी रुपयांचे रस्ते रद्द करणे, नगरसेवक निधीच्या नावाखाली सुरू असलेला गैरव्यवहार, ठेकेदारीतील साखळी या सर्व प्रकारांबाबत वेगवेगळ्या गु्रपवर पोस्ट शेअर केल्या जात आहेत. त्यामुळे मुंढे हटाव मोहिमेलादेखील जोर आला आणि त्यांनी करवाढ लादल्याने नागरिकांना कशाप्रकारे आर्थिक बोजा सहन करावा लागणार आहे, याबाबत पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. त्यानुसार त्याला उत्तर देणाऱ्या पोस्ट मुंढे सर्मथकांकडून तयार केल्या जात असून विविध व्हॉटसग्रुप आणि फेसबुक पेजवर टाकल्या जात आहेत.
मुख्यमंत्र्यांची घेणार भेट
मुंढे यांच्या विरोधात भाजपाने अविश्वास ठराव दाखल केला असला तरी नगरसेवक खात्याचे प्रमुख आणि नाशिकला दत्तक घेणाºया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याची कार्यकर्त्यांची तयारी सुरू आहे. राज्यात भाजपाची सत्ता असताना मुंढे यांच्यावर अविश्वास ठराव कशासाठी असा प्रश्न करण्यात येणार आहे.
आयुक्तांना भेटणार
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मोठ्या प्रमाणात दरवाढ केल्याच्या पोस्ट सोशल मीडियावरून व्हायरल होत असल्याने त्या खºया की खोट्या याची माहिती घेऊन आयुक्तांनीही याबाबत निराकरण करावे अशाप्रकारची माहिती घेण्यासाठी मुंढे समर्थक गुरुवारी (दि.३०) आयुक्तांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले.
आजपासून जनमत संग्रह
मुंढे समर्थकांच्या वतीने थेट नागरिकांना भेटून करवाढीचे चुकीचे अर्थ कसे काढले जात आहेत हे पटविण्यात येणार असून, त्यांचा जनमत संग्रह केला जाणार असल्याने त्यासंदर्भात गुरुवारी (दि.३०) सकाळपासून अविश्वास ठराव नेमका कुणावर अशी जनमतसंग्रह मोहीम राबविली जाणार आहे.