समाजकल्याण कर्मचाऱ्यांचे आंदोलन
By Admin | Published: August 8, 2016 11:52 PM2016-08-08T23:52:58+5:302016-08-08T23:54:50+5:30
समाजकल्याण कर्मचाऱ्यांचे आंदोलन
नाशिक : समाजकल्याण खात्याच्या कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी कर्मचारी संघटनेने सोमवारपासून सप्ताहभर काळ्या फिती लावून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
शासनाने समाजकल्याण विभागाबाबत अनेक निर्णय घेतले असून, त्यातील काही निर्णय कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक आहेत. मुळात या खात्यात कर्मचाऱ्यांची अनेक रिक्त पदे असताना नवनवीन योजना सुरू करण्यात आल्या आहेत. कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या शासन दरबारी प्रलंबित असताना आता पुन्हा कर्मचारी कपातीचे धोरण सरकारने स्वीकारल्याने कर्मचाऱ्यांमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाल्याने त्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यपातळीवर संघटनेने आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. सोमवारी कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज केले, तसेच दुपारी जेवणाच्या सुटीत निदर्शनेही केली, अशी माहिती राजेंद्र कांबळे, भूषण शेळके, शशिकांत पाटील यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)