चाळकऱ्यांच्या मदतीला धावली सोसायटी
By admin | Published: August 5, 2016 01:29 AM2016-08-05T01:29:19+5:302016-08-05T01:29:37+5:30
भगूरकर चाळीतील पूरग्रस्तांना आश्रय : प्राउड आॅफ ‘शाकुंतल प्राईड’
नाशिक : गंगापूररोडवरील चैतन्यनगरातील भगूरकर चाळीत गेल्या वीस वर्षांपासून कष्टकरी वस्तीला. लगतच शाकुंतल प्राईड या सोसायटीची इमारत उभी राहिलेली. दररोज सोसायटीमधून चाळीतील कष्टकऱ्यांचे जीवन अनुभवणाऱ्या रहिवाशांनी मंगळवारी आलेल्या महापुराचा थरार ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवला आणि बघता-बघता तीन तासांच्या अवधीत कष्टकऱ्यांची चाळ पाण्याखाली गुडूप झाली. सैरभैर झालेल्या चाळीतील २२ कुटुंबांपुढे निवाऱ्याचा प्रश्न उभा राहिला आणि चाळकऱ्यांच्या मदतीला सोसायटी धावून आली. सोसायटीच्या पार्किंगचा परिसर खुला करून देण्यात आला आणि नास्ता-भोजनापासून कपडालत्तापर्यंत विस्थापित चाळकऱ्यांची सारी बडदास्त सोसायटीतील रहिवाशांनी ठेवली. दोन रात्र निवारा लाभल्यानंतर ज्यावेळी चाळकऱ्यांनी सोसायटीचा परिसर सोडला त्यावेळी प्रत्येकाच्या मुखातून ‘शाकुंतल प्राईड’बद्दल कृतज्ञतेचा स्वर निघाला.
चैतन्यनगरातील गोंदवलेकर मंदिराजवळ गेल्या वीस वर्षांपासून भगूरकर चाळ व शिंदे चाळमध्ये कष्टकरी-श्रमजीवी वर्ग वस्तीला आहे. मंगळवारी (दि. २) धो-धो पाऊस कोसळायला सुरुवात झाल्यानंतर गोदावरीच्या महापुराचे पाणी वाढत जाऊन ते भगूरकर चाळीच्या अंगणात येऊन पोहोचले. धोक्याची चाहूल लागल्यानंतर चाळकऱ्यांनी जे हाती लागेल ते सोबत घेत बाहेर पळ काढला आणि अवघ्या तीन तासांत आख्खी भगूरकर चाळ पुराच्या पाण्याखाली गुडूप झाली. डोळ्यादेखत आपली घरे पाण्याखाली गेल्यानंतर चाळीतील २२ कुटुंबातील सुमारे ११० सदस्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. आता लेकरा-बाळांसह जायचे कुठे हा प्रश्न पुढे उभा राहिला. अखेर रोज आपल्या सोसायटीच्या खिडकीतून कष्टकऱ्यांचे जीवन अनुभवणाऱ्या ‘शाकुंतल प्राईड’ या सोसायटीतील रहिवाशांमधील मानवतेने साद घातली. नाट्यलेखक दत्ता पाटील व प्रतिभा पाटील या दाम्पत्याने पुढाकार घेतला आणि त्यांच्या सोबत आख्खी सोसायटी उभी राहिली. पार्किंगमधील परिसर मोकळा करून देत सर्व विस्थापितांना निवारा उपलब्ध करून दिला.