कोरोना योद्धांच्या कार्याची जाणीव समाजाने ठेवावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:16 AM2021-09-27T04:16:40+5:302021-09-27T04:16:40+5:30
नाशिक : कोरोना काळात विविध क्षेत्रात कर्तव्यावर असलेल्या अनेक नागरिकांनी अत्यंत प्रामाणिकपणे आणि जिवाची पर्वा न करता कार्य केले. ...
नाशिक : कोरोना काळात विविध क्षेत्रात कर्तव्यावर असलेल्या अनेक नागरिकांनी अत्यंत प्रामाणिकपणे आणि जिवाची पर्वा न करता कार्य केले. तसेच समाजाच्या विविध क्षेत्रातही अनेकांनी चांगले कार्य केल्यानेच समाजाने त्यांच्या कार्याची जाणीव ठेवण्याच्या हेतूने त्यांचा सन्मान करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन संगमनेरच्या नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी केले. नाशिकच्या जाणीव सांस्कृतिक अभियानाच्या वतीने जिल्ह्यासह जिल्हाबाहेरील कोरोना योद्धांचा सन्मान खासदार हेमंत गोडसे, उपमहापौर भिकुबाई बागुल, इतिहासतज्ज्ञ डॉ. स्मिता देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.
येथील प.सा. नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमात विविध जिल्ह्यातील आणि क्षेत्रातील १० मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलताना तांबे यांनी जागतिक कन्यादिनी काेरोनायोद्धा म्हणून काही महिलांचा गौरवदेखील करता आल्याचा आनंद व्यक्त केला. खासदार हेमंत गोडसे यांनी सर्व कोरोना योद्धांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. उपमहापौर बागुल यांनी सर्व कोरोना योद्धांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले. इतिहासतज्ज्ञ देशमुख यांनी सर्व महिलांनी जिजाऊंपासून प्रेरणा घेऊन जीवन घडविण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील यांनी तर सूत्रसंचालन शिल्पा फासे यांनी आणि आभारप्रदर्शन सचिव गौरव थोरात यांनी केले.
इन्फो
दहा मान्यवरांचा सन्मान
सुरतचे मनोज पवार, नागेबाबा उद्योग समूहाचे कडूभाऊ काळे, मालेगावचे अनिल निकम, अहमदाबादचे प्रवीण नवले, जालन्याच्या सिव्हिल सर्जन डॉ. अर्चना भोसले किर्दक, नाशिकचे जि.प. अधिकारी महेश बच्छाव, आरोग्य सेविका रेखा निकम सूर्यवंशी, शिंदखेडाचे पोलीस निरीक्षक सुनील भाबड, स्व. विद्या विनोद अधिकारी, पेणचे दयानंद भगत या मान्यवरांना यावेळी कोरोना योद्धे आणि सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले.
फोटो
२६पीएचएसपी ६३