समाजशिल्पी तुकाराम दिघोळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2020 01:09 AM2020-12-18T01:09:03+5:302020-12-18T01:09:24+5:30
राज्याचे माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त त्यांना वाहण्यात आलेली आदरांजली...
राज्याचे माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त त्यांना वाहण्यात आलेली आदरांजली...
सिन्नर तालुक्याच्या विकासात आणि वैभवात भर घालणारे जे लोक होऊन गेले त्यापैकी तुकाराम दिघोळे हे महत्त्वाचे नाव. दिघोळे यांना सिन्नर तालुक्याचे प्रतिनिधीत्व विधानसभेत करायला मिळाले आणि त्यांच्यातला समाजशिल्पी सतत जागा राहिला. आमदार म्हणून काम करताना त्यांनी रचनात्मक कामाला महत्व दिले. त्यांच्या रचनात्मक कामांपैकी माळेगावची औद्योगिक वसाहत हे पहिले उदाहरण. त्यातून सिन्नर तालुक्यात औद्योगीकरणाला गती मिळाली आणि स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगारही मिळाला. त्यामुळे सिन्नरच्या अर्थव्यवस्थेला गती आली. सिन्नर तालुक्याबरोबरच शहराचा विकास , विस्तार होत गेला . तुकाराम दिघोळे यांनी क्रांतिवीर वसंतराव नारायण नाईक या शिक्षण संस्थेला उर्जितावस्था प्राप्त करून दिली. तोपर्यंत माध्यमिक शिक्षणाच्या क्षेत्रात ही संस्था काम करीत होती. दिघोळे यांनी संस्थेला उच्च शिक्षणाकडे नेले. संस्थेची आज महाविद्यालये सुरू झाली आहेत. दिंडोरी आणि नाशिक येथे असणारी ही महाविद्यालये आपला नावलौकिक राखून आहेत. त्याच बरोबर दिघोळे यांनी व्यवसायिक शिक्षणाला महत्त्व देऊन आय टी आय , इंजिनिअरिंग कॉलेजचेस सुरू केली . थोडक्यात नाशिक जिल्ह्यात या संस्थेचा जो विकास झाला तो तुकाराम दिघोळे यांच्या दूरदृष्टीतून झाला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. नामदार दिघोळे यांना सिन्नर तालुक्यातून प्रथमतः महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात स्थान मिळविणे आणि तेथेही स्वतःचा लौकिक संपादन केला . समाजातील सर्व थरातील माणसांशी त्यांचा संपर्क होता. गावागावात त्यांना ओळखणारे , मानणारे अनेक कार्यकर्ते आहेत. त्याचा उपयोग त्यांनी राजकारण, समाजकारण , शिक्षण, सहकार या क्षेत्रात काम करताना करून घेतला.
दूरदृष्टीने वाटचाल करणारे तुकाराम दिघोळे यांची आज पहिली पुण्यतिथी. त्यांचा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा होत असे. आता त्यांचे पुण्यस्मरण आपल्याला करावे लागते आहे. उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची जनरीत आहे. तरीसुद्धा तुकाराम दिघोळे, एन एम आव्हाड, नानासाहेब गडाख ही सूर्यासारखी माणसे आपल्यात नसली तरी त्यांचे योगदान विसरता येत नाही . दिघोळे आज आपल्यात नाहीत तरीसुद्धा सिन्नरच्या तहानलेल्या मातीला विकासाची गती दाखवणाऱ्या दिघोळे यांना विसरता येत नाही .
तुकाराम दिघोळे यांचे कायमचे स्मरण व्हावे यासाठी काही रचनात्मक विधायक उपक्रम केला जावा असे मला वाटते. त्यातून दिघोळे यांचा आठव होत राहील. आपली पुढची पिढी स्मार्ट आहे. ही पिढी घडवण्याचे काम दिघोळें सारख्या माणसांनी अहोरात्र परिश्रम करून केले आहे . त्याची नोंद, दखल समाजाने घेतली पाहिजे असे मला वाटते.
- डॉ. शंकर बोऱ्हाडे