बागलाणमध्ये कोरोना प्रतिबंधासाठी सोडियम हायपोक्लोरॉइड फवारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 02:52 PM2020-03-31T14:52:08+5:302020-03-31T14:52:58+5:30
कोरोनाचा संसर्ग प्रतिबंधित करण्यासाठी बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी स्वखर्चाने बागलाण तालुक्यातील सटाणा,नामपूर, जायखेडा यासारख्या दाट लोकवस्तीच्या गावांमध्ये शासनाने प्रमाणित केलेल्या सोडियम हायपोक्लोरॉईड या प्रभावी औषधाच्या फवारणी मोहिमेस प्रारंभ करण्यात आला.
सटाणा : कोरोनाचा संसर्ग प्रतिबंधित करण्यासाठी बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी स्वखर्चाने बागलाण तालुक्यातील सटाणा,नामपूर, जायखेडा यासारख्या दाट लोकवस्तीच्या गावांमध्ये शासनाने प्रमाणित केलेल्या सोडियम हायपोक्लोरॉईड या प्रभावी औषधाच्या फवारणी मोहिमेस प्रारंभ करण्यात आला.
सध्या संपूर्ण देशात कोरोना संसर्गाने धुमाकूळ घातलेला आहे. मात्र कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केंद्र शासन आणि महाराष्ट्र सरकारने २४ मार्चपासून देशात संचारबंदी लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार बोरसे यांनी आजपासून सटाणा शहरासह नामपूर ,जायखेडा येथे स्वखर्चाने सोडियम हायपोक्लोरॉईड या औषधाची फवारणी सुरू केली आहे. गावागावातील सरपंच, उपसरपंच, सदस्यांसह ग्रामस्थांनीही या मोहिमेचे स्वागत करीत ही मोहीम प्रभावीपणे राबविण्याचा संकल्प केला आहे. मोहिमेचा शुभारंभ करतांना आमदार बोरसे म्हणाले, प्रत्येक नागरिकाने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक ती काळजी घेण्याची गरज आहे.अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त शक्यतो घराबाहेर पडू नये, बाहेर पडताना तोंडाला मास्क किंवा रु माल बांधावा, समोरच्या व्यक्तीशी बोलताना लांब अंतरावरून बोलावे, घरात कोमट पाणी प्यावे, खोकला किंवा श्वास घेण्यास त्रास जाणवल्यास त्वरित संबंधित डॉक्टरांशी संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी केले.
या औषध फवारणी मोहिमेत आमदार बोरसे यांच्यासमवेत तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील, पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे, , जिल्हा परिषद माजी सदस्य पप्पू बच्छाव, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष साहेबराव सोनवणे, शहराध्यक्ष राहुल सोनवणे, नगरसेवक काकाजी सोनवणे, विकी सोनवणे, योगेश सूर्यवंशी, भाजपा युवती तालुकाध्यक्ष रूपाली पंडित, सामाजिक कार्यकर्ते अनिल पाकळे, शहराध्यक्ष ज्योती ठाकरे, नगरसेविका सुवर्णा देवरे यांच्यासह शहरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.