शेतकऱ्यांसाठी सौरऊर्जा उपयुक्त
By admin | Published: November 4, 2015 10:43 PM2015-11-04T22:43:17+5:302015-11-04T22:43:56+5:30
रामचंद्र भोगले : चेंबरतर्फे आयोजित कार्यशाळेत प्रतिपादन
नाशिक : दिवसेंदिवस विजेचा वापर वाढत असून, त्या तुलनेत विजेची निर्मिती होत नसल्याने मागणी व पुरवठा यांचा समन्वय साधला जात नाही. अशा स्थितीत शेतकऱ्यांना सौर ऊर्जेचा आणि पंपाचा वापर सोयीचा आणि वरदान ठरू शकेल, असे मत महाराष्ट्र चेंबरचे माजी अध्यक्ष रामचंद्र भोगले यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चर यांच्या वतीने अशोका सभागृहात सौरपंप आणि पी. व्ही. पॅनल याविषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. खासदार हेमंत गोडसे, सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य अभियंता बी. जी. जाधव, एम.एस.ई.डी.सी.एल.चे मुख्य अभियंता व्ही. बी. बढे, चेंबरचे उपाध्यक्ष संतोष मंडलेचा, चेंबरच्या अपारंपरिक ऊर्जा समितीचे अध्यक्ष यू. के. शर्मा आणि उपाध्यक्ष विलास शिरोरे यावेळी उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी सौर ऊर्जेचा वापर केल्यास मोठ्या प्रमाणात विजेची बचत होऊ शकते. हीच वीज अन्यत्र वापरली जाईल. विजेचे दर वाढले की त्याचा थेट परिणाम उद्योजकांवर होत असतो. शेतकऱ्यांना देण्यात येणारी वीज बिल माफी किंवा वीज बिलातील सवलत भरून काढण्यासाठी उद्योजकांवरच अधिभार लावला जातो. त्यामुळे उद्योजकांना महाग दराने वीज घ्यावी लागते. त्यामुळे यावर मात करण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर वाढला पाहिजे, असेही भोगले म्हणाले. विलास शिरोरे यांनी प्रास्ताविक, तर निता आरोरा यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी ममता पाटील, अश्विनी बोरस्ते, योगीता अहेर, तसेच चेंबरचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)