शेतकऱ्यांसाठी सौर कृषिपंप योजना
By Admin | Published: September 19, 2015 11:45 PM2015-09-19T23:45:22+5:302015-09-19T23:46:08+5:30
शेतकऱ्यांसाठी सौर कृषिपंप योजना
नाशिकरोड : शेतकऱ्यांना अपारंपरिक ऊर्जेचा लाभ घेता यावा म्हणून महावितरणने शेतकऱ्यांसाठी सौर कृषिपंप योजना सुरू केली आहे. जिल्ह्यात १३० शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा घेता येणार असून, शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.
अपारंपरिक ऊर्जेचा लाभ शेतकऱ्यांना घेता यावा म्हणून महावितरणने सौर कृषिपंप योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्रता व प्राधान्यक्रमानुसार ५ एकरपेक्षा कमी जमिनीचे क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना ३.५ किंवा ७.५ एचपी क्षमतेचे सौर कृषिपंप देण्यात येणार आहे. ३ एचपीएसी पंपकरिता १६ हजार २००, ५ एचपीएसी पंपाकरिता २७ हजार व ७.५ एचपी पंपाकरिता ३६ हजार रुपये शुल्क भरावे लागेल. तसेच ३ एचपी डीसी पंपाकरिता २० हजार, ५ एचपीडीसी पंपाकरिता ३३ हजार ७५० रुपये भरावे लागतील व उर्वरित रक्कम राज्य, केंद्र शासनाचा हिस्सा व कर्जाच्या स्वरूपात असेल. राज्य शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात येणारी जिल्हास्तरीय समिती या योजनेसाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांची निवड करेल व समिती लाभार्थ्यांचे प्राधान्यक्रम ठरवेल.
प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर या योजनेचे काम चालणार असून, शेतकऱ्यांनी २० आॅगस्टपर्यंत सदर योजनेच्या माहितीसाठी महावितरणच्या विभागीय किंवा उपविभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. (प्रतिनिधी)