पाच टक्के भरून मिळणार सौर कृषिपंप
By admin | Published: May 20, 2015 11:40 PM2015-05-20T23:40:26+5:302015-05-20T23:47:16+5:30
राज्याला ७,५४० पंपांचे उद्दिष्ट : साडेचारशे कोटींची तरतूद
नाशिक : केंद्र सरकारने पर्यावरणपूरक अपारंपरिक ऊर्जास्रोतांना बळकटी देण्याचे धोरण आखले असून, त्यानुसार देशात राष्ट्रीय पातळीवर शेतकऱ्यांना अवघी पाच टक्के रक्कम भरून सौर कृषिपंप उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महाराष्ट्राला ४,७५० नग सौर कृषिपंप उपलब्ध करून देण्यात येणार असून, या पंपांच्या ५ टक्के रकमेची म्हणजे सुमारे ४४५ कोटी रुपयांची तरतूद राज्य सरकारला करावी लागणार आहे.
उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने यासंदर्भात परिपत्रक काढले आहे. त्यानुसार केंद्र सरकार राष्ट्रीय पातळीवर एक लाख सौर कृषिपंप वितरीत करणार असून, महाराष्ट्र राज्याला त्यातील ४,७५० कृषिपंप मिळणार आहेत. सौर कृषिपंपांच्या एकूण रकमेपैकी केवळ पाच टक्के रक्कम शेतकरी लाभार्थ्यांना, तर पाच टक्के रक्कम राज्य सरकारला भरावी लागणार असून, ३० टक्के वाटा हा केंद्र सरकार उचलणार आहे. तसेच उर्वरित ६० टक्के रक्कम कर्ज काढावे लागणार आहे. ३ अश्वशक्तीच्या सौर कृषिपंपाची किंमत ३ लाख २४ हजार इतकी असून, शेतकऱ्यांना या रकमेच्या ५ टक्के म्हणजेच १६ हजार २०० रुपये रक्कम भरावी लागणार असून, तितकीच रक्कम राज्य सरकार भरणार आहे. केंद्र सरकार ९७ हजार २०० रुपये (३० टक्के रक्कम) भरणार असून उर्वरित १ लाख ९४ हजार ४०० रुपये लाभार्थ्यांना कर्ज घ्यावे लागणार आहे. या योजनेच्या लाभार्थी निवडीच्या निकषात राज्यातील अकोेला, अमरावती, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा या जिल्ह्यांतील आत्महत्त्याग्रस्त शेतकरी, शासनाच्या धडक सिंचन योजनेंतर्गत विहिरींचा लाभ घेतलेले लाभार्थी शेतकरी, अतिदुर्गम भागातील शेतकरी, राज्यातील पारंपरिक पद्धतीने विद्युतीकरण न झालेल्या गावांतील शेतकरी, विद्युतीकरणासाठी वन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसलेल्या भागांतील शेतकरी, महावितरण कंपनीकडे पैसे भरून प्रलंबित असलेल्या ग्राहकांपैकी ज्यांना तांत्रिक अडचणींमुळे नजीकच्या काळात वीजपुरवठा शक्य नाही ते शेतकरी, तसेच लाभार्थी शेतकऱ्यांचे क्षेत्र पाच एकरपेक्षा जास्त असू नये, यांसह अन्य निकष या योजनेत सहभागी असण्यासाठी टाकण्यात आले आहेत. या योजनेनुसार शेतकऱ्यांना सौर कृषीपंपांच्या एकूण किमतीच्या पाच टक्के रक्कम भरून ३ अश्वशक्ती ए.सी. पंप व ३ अश्वशक्ती डी.सी. पंप, ५ अश्वशक्ती ए.सी.पंप व ५ अश्वशक्ती डी.सी.पंप त्याचप्रमाणे ७ अश्वशक्ती ए.सी. पंप सौर कृषीपंप घेता येतील.(प्रतिनिधी)