अतांत्रिक कर्मचाऱ्याच्या जिवावर बेतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 12:27 AM2019-04-19T00:27:02+5:302019-04-19T00:27:18+5:30
कडाउन झालेल्या बसच्या दुरुस्तीसाठी पाठविण्यात आलेला अतांत्रिक कारागीर दोन बसमध्ये सापडून जखमी झाल्याचा गंभीर प्रकार गेल्या सोमवारी ठक्कर स्थानकात घडल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
नाशिक : ब्रेकडाउन झालेल्या बसच्या दुरुस्तीसाठी पाठविण्यात आलेला अतांत्रिक कारागीर दोन बसमध्ये सापडून जखमी झाल्याचा गंभीर प्रकार गेल्या सोमवारी ठक्कर स्थानकात घडल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. मात्र सदर प्रकरण दडपण्याचा प्रकार येथील अधिकाऱ्यांकडून केला जात असल्याने या प्रकरणाची कोणतीही नोंद कार्यालयीन पातळीवर करण्यात आलेली नसून, ब्रेकडाउनसाठी अतांत्रिक कर्मचाºयाला पाठविण्याचा निर्णय घेणाºया प्रभारी अधिकाºयाच्या कार्यपद्धतीविषयी कर्मचारी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार गेल्या सोमवारी (दि़१५) ठक्कर बझार बसस्थानकात एमएच१४/बीटी ०७०९ ही बस नादुरुस्त झाली होती. सदर बस डेपोत घेऊन येण्यासाठी डेपोतून एमएच४०/६२२७ ही बस पाठविण्यात आली. नादुरुस्त बस दुरुस्त करण्यासाठी डेपोतील प्रभारी कारागिराने अतांत्रिक कारागीर ज्याला बस दुरुस्तीचा कोणताही अनुभव नाही अशा कर्मचाºयाला पाठविले. या ठिकाणी बस दुरुस्तीचे काम सुरू असताना दोन्ही बसच्या मध्ये संबंधित अतांत्रिक कर्मचारी सापडल्याने तो जखमी झाला. त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, या प्रकरणाची कोणतीही वाच्यता करण्यात आली नाही. अधिकाºयांनी या प्रकरणी मौन बाळगले असून, संबंधित कर्मचाºयाला रुग्णालयातून घरीही पाठविण्यात आले आहे. मात्र कार्यालयीन पातळीवर या प्रकरणाची नोंद घेण्यात आली नसल्याचे समजते.
राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक आगार क्रमांक १ मधील कामकाजाची पद्धत आणि अधिकाºयांची मनमानी या घटनेमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. ठक्कर बसस्थानकात ब्रेकडाउन झालेली बस आगारात घेऊन येण्यासाठी अतांत्रिक कर्मचाºयाला कोणत्या निकषावर पाठविण्यात आले, याचा उलगडा होणे अपेक्षित असताना अधिकाºयांनी मात्र सदर प्रकरण रफादफा करण्याचा घाट घातला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सुदैवाने संबंधित कर्मचारी या घटनेतून बचावला असला तरी महामंडळाने याची नोंद घेतलेली नसल्याने कोणतेही भरपाई आणि उपचार खर्चाबाबत संबंधित कर्मचारी वंचित राहण्याची शक्यता आहेच. शिवाय आॅन ड्यूटी जखमी होऊनही त्याला कोणतीही भरपाई देण्यात आलेली नाही.
अधिकाºयांकडून कानावर हात
या प्रकरणी विभाग नियंत्रक आणि वाहतूक अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणाची आपणाला पुरेशी माहिती नसल्याचे सांगितले. विभाग नियंत्रकांनी सांगितल्यानुसार प्रभारी आगार व्यवस्थापकांशीदेखील संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. संबंधित साळुंके नामक कर्मचाºयाची प्रकृती पाहण्याठी एडब्लूएस, एमई, तसेच कनिष्ठ अभियंता हे अधिकारी गेले होते मात्र त्यांच्या वरिष्ठ अधिकाºयांनी या प्रकरणी माहिती नसल्याचे सांगून सदर प्रकार लपविण्याचा प्रकार केल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे एका कर्मचारी नेत्यानेदेखील सदर प्रकार किरकोळ असल्याचे सांगून गांभीर्य दाखविले नाही.
मनमानी कारभार उघड
डेपो क्रमांक १ मध्ये वरिष्ठांच्या जागांवर कनिष्ठ कर्मचारी दांडगाईने कामकाज करीत असून, इतर कर्मचाºयांवर अन्याय करीत असल्याच्या अनेक तक्रारी अधिकाºयांकडे करण्यात आलेल्या आहेत. मात्र अजूनही या महत्त्वाच्या पदांवर कनिष्ठ कर्मचारी आपल्या हाताखालील कर्मचाºयांवर अन्याय करीत असल्याची चर्चा लपून राहिलेली नाही. अगोदरच कर्मचाºयांची संख्या कमी आणि अधिकाºयांची अधिक अशी येथील डेपोची परिस्थिती झालेली आहे. सदर दुर्घटनादेखील याचमुळे घडल्याची चर्चा होत आहे.