शिपायाची पत्नी बाधित, नगरपरिषदेला टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 04:03 PM2020-07-06T16:03:18+5:302020-07-06T16:03:32+5:30
नांदगाव : नगरपरिषदेतील शिपायाची पत्नी कोरोना बाधित निघाल्याने संपूर्ण कार्यालयाला सोमवारी टाळे ठोकण्यात आले. शिपाई येवल्याहून ये-जा करतो. त्याच्या येवला येथे राहणाऱ्या पत्नीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याचा स्वॅब चाचणीसाठी पाठविण्यात आला आहे. शिपाई असल्याने कार्यालयातील प्रत्येक टेबलशी व कर्मचारी वर्गाशी त्याचा संबंध येतो, यासाठी सदर दक्षता घेण्यात आली.
दोन महिन्यात १७ कोरोनाग्रस्त शहरात आढळून आले. त्यातल्या चार जणांचा मृत्यू झाला. या परिस्थितीत पाणी सोडणारा असो की, साफसफाई करणारे कर्मचारी, आरोग्य कर्मचारी कार्यालयीन अधिकारी यांनी कोरोना प्रतिबंधक साधनांचा शास्त्रीय पद्धतीने वापर करून शहराला सेवा दिली व स्वत: ला सुरिक्षत ठेवले. मात्र अचानक येवला मार्गे नगरपरिषदेचा दरवाजा ठोठावणा-या कोरोनामुळे प्रशासनाने तातडीने नगर परिषदेची इमारतच सील करून टाकली आहे. सर्वांना आता शिपायाच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. दरम्यान प्राप्त परिस्थितीत सुध्दा मुख्यालयी न राहता अपडाऊन करणा-या इतर शासकीय कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी यांची चौकशी करण्यात यावी. मुख्यालयी न राहणा-या शिक्षकांना शाळेत येतांना कोरोना बाधित नसल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र बाहेरगावाहून येताना सादर करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत.