वाळूमाफियांकडून तलाठ्यास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 01:55 AM2018-10-12T01:55:43+5:302018-10-12T01:56:18+5:30
लोहोणेर येथे गिरणा नदीपात्रात वाळू तस्करांवर कारवाईसाठी गेलेल्या तलाठ्यावर वाळू-माफियांनी हल्ला चढवून गंभीर जखमी केले. वाळूमाफियांवर मोक्कान्वये कारवाई करावी तसेच पोलीस बंदोबस्त दिल्याशिवाय तलाठ्यांवर वाळूची कारवाई सोपवू नये या मागणीसाठी जिल्ह्णातील तलाठी संघटनेने बेमुदत कामबंद आंदोलन छेडले आहे.
नाशिक : लोहोणेर येथे गिरणा नदीपात्रात वाळू तस्करांवर कारवाईसाठी गेलेल्या तलाठ्यावर वाळू-माफियांनी हल्ला चढवून गंभीर जखमी केले. वाळूमाफियांवर मोक्कान्वये कारवाई करावी तसेच पोलीस बंदोबस्त दिल्याशिवाय तलाठ्यांवर वाळूची कारवाई सोपवू नये या मागणीसाठी जिल्ह्णातील तलाठी संघटनेने बेमुदत कामबंद आंदोलन छेडले आहे.
गुरुवारी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. अंबादास रामदास पूरकर अवैध वाळू उपसा करणाऱ्यांच्या विरोधात गिरणा नदीपात्रात कारवाईसाठी गेले असता दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने त्यांना मारहाण केली. मारहाणीत पूरकर हे जागीच बेशुद्ध पडल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचे वृत्त कळताच जिल्ह्यातील तलाठ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
जिल्ह्यात वाळूमाफियांची तस्करी व दादागिरी वाढली आहे. गेल्या महिन्यात तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांच्यावरही सामनगाव रस्त्यावर वाळूमाफियांनी लोखंडी टॉमी उगारण्याचा प्रयत्न केला होता. तहसीलदारांकडून वाळूमाफियांवर कारवाई करण्यासाठी तलाठी, मंडळ अधिकाºयांवर दबाव टाकला जातो. मारहाण करणाºयांविरुद्ध मोक्कान्वये कारवाई होत नाही, तोपर्यंत बेमुदत कामकाज बंद ठेवण्यात येणार असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
तक्रारीची दखल नाही
विशेष म्हणजे तलाठी पूरकर यांनी यापूर्वी वाळूमाफियांविरुद्ध कारवाई केल्यामुळे त्यांना अधूनमधून धमक्या येत होत्या. देवळा तहसीलदारांनी पूरकर यांची भरारी पथकात नेमणूक केल्याने पूरकर यांनी पाच दिवसांपूर्वीच येत असलेल्या धमक्यांची लेखी तक्रार तहसीलदारांकडे केली होती, परंतु त्याची दखल घेतली गेली नाही व भरारी पथकाला पोलीस बंदोबस्तही देण्यात आलेला नाही. त्यामुळे सदरची घटना घडल्याचे तलाठ्यांचे म्हणणे आहे.