हरणबारीचे आवर्तन सुटल्याने समाधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 12:38 AM2019-05-13T00:38:31+5:302019-05-13T00:38:44+5:30
मालेगाव : महिनाभरापासून बागलाण व मालेगाव तालुक्यात तीव्र स्वरूपाची पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
मालेगाव : महिनाभरापासून बागलाण व मालेगाव तालुक्यात तीव्र स्वरूपाची पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणीटंचाईवर पर्याय म्हणून हरणबारीचे आवर्तन सोडण्याची मागणी दोन्ही तालुक्यातील जनता करीत होती. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र पाठविल्याने शुक्रवारी (दि. ११) सायंकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी धरणाचा जॅकवेल खोलून सुमारे ५०० क्युसेस पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला. एकूण पाण्यापैकी ३५० दलघफू. पाणी पिण्यासाठी नदीपात्रात सोडण्यात येणार असून, किमान १८ तारखेपर्यंत नदीपात्रात पाणी सोडले जाईल. तसेच सदर पाणी मालेगाव शहराजवळील वैतागवाडी धरणापर्यंत पोहोच केले जाणार आहे. हे पाणी केवळ पिण्यासाठी असून शेतीला वापर करू नये, आवर्तन काळात शेती पंप बंद ठेवावेत तसेच अवैधरीत्या पाण्याची नासाडी केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारासुद्धा पाटबंधारे खात्याने दिला आहे. मालेगाव तालुक्यातील नदीकाठावरील गावांना पाणी पोहोच करण्यासाठी सर्वांनीच सहकार्य करण्याचे आवाहन हरणबारी सिंचन अभियंता आर. बी. सूर्यवंशी, पोलीस अधिकारी गणेश गुरव यांनी केले आहे. या आवर्तनामुळे बागलाणसह मालेगाव तालुक्यातील जनतेला तीव्र पाणीटंचाईपासून तूर्त दिलासा मिळाला आहे. हरणबारी आवर्तन सुटल्यामुळे सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.