सतरा ब्लॅक स्पॉटवर करणार उपाययोजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 12:26 AM2018-07-10T00:26:46+5:302018-07-10T00:27:05+5:30
बेशिस्त वाहनधारकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याने शहरात अपघातांची संख्या वाढत आहे़ शहरात अपघाताची सतरा (ब्लॅक स्पॉट) ठिकाणं अशी आहेत की त्यामध्ये प्राणहानी झालेली आहे़
नाशिक : बेशिस्त वाहनधारकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याने शहरात अपघातांची संख्या वाढत आहे़ शहरात अपघाताची सतरा (ब्लॅक स्पॉट) ठिकाणं अशी आहेत की त्यामध्ये प्राणहानी झालेली आहे़ अपघातांच्या या ब्लॅक स्पॉटवर होणाऱ्या अपघातांच्या कारणांचा शहर वाहतूक शाखेकडून अभ्यास सुरू आहे़ या अभ्यासातील निष्कर्षानुसार अपघात कसे कमी करता येतील, यासाठी वाहतूक शाखेमार्फत उपाययोजना केल्या जाणार आहेत़
नाशिक शहरातील राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग व इतर मुख्य रस्त्यांवर सुमारे पाचशे मीटर (पाचशे मीटर अपघात प्रवणक्षेत्र) अंतरामध्ये मागील सलग तीन वर्षांच्या कालावधीत एकूण पाच प्राणांकित अपघात किंवा गंभीर अपघात किंवा सलग तीन वर्षांत एकूण दहा व्यक्ती मृत्युमुखी पडल्या असतील असे ठिकाण ब्लॅक स्पॉट (तीव्र अपघात वळण स्थळ) म्हणून ठरविले जाते़ नाशिक शहरात वेगमर्यादेचे उल्लंघनामुळे सर्वाधिक तर त्याखालोखाल चौफुल्यांवर अपघात होण्याचे प्रमाण अधिक आहे़ या अपघातांमध्ये दुचाकी अपघात व त्यामध्ये प्राण गमावणाºयांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे़ दुचाकीवरील बहुतांशी अपघातातील दुचाकीस्वाराचा मृत्यू हा हेल्मेट परिधान न केल्याने झालेला आहे़ दुचाकीचालकाने हेल्मेट परिधान केले असते तर त्यांचा जीव निश्चित वाचू शकला असता़ मात्र, हेल्मेटकडे दुचाकीस्वारांकडून ओझे म्हणून केले जाणारे दुर्लक्षच जिवावर बेतल्याचे समोर आले़ त्यामुळे वाहतूक शाखेमार्फत विविध उपाययोजना केल्या जाणार आहेत़
शहरातील असे आहेत ब्लॅक स्पॉट
आजमितीस शहरातील पंचवटी-तपोवन क्रॉसिंग, आडगाव-स्वामीनारायण चौफुली, क़ का़ वाघमहाविद्यालय, बळीमंदिर रासबिहारी चौफुली, नांदूर नाका सिग्नल, मिरची हॉटेल सिग्नल नाशिकरोड-चाडेगाव फाटा, दत्तमंदिर सिग्नल, शिंदेगाव, उपनगर - फेम सिग्नल, पंचवटी - तारवालानगर सिग्नल, सरकारवाडा - सीबीएस सिग्नल, शरणपूररोड सिग्नल, गडकरी चौक सिग्नल, जुना गंगापूर नाका सिग्नल, म्हसरूळ - राऊ हॉटेल सिग्नल, सातपूर - कार्बन नाका हे अपघाताचे ब्लॅक स्पॉट आहेत़