ग्रामस्थांमध्ये समाधान : शाळेचे रंग-रूप पालटण्यासाठी माजी विद्यार्थी सरसावले जिल्हा परिषदेच्या दगडी शाळेने टाकली कात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 12:11 AM2018-04-02T00:11:59+5:302018-04-02T00:11:59+5:30
चांदवड : १८४५ मध्ये स्थापन झालेल्या शहरातील सर्वात जुनी असलेल्या पुरातन रंगमहालातील जिल्हा परिषदेच्या ‘दगडी शाळे’ने कात टाकली असून, माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत शाळेला डिजिटल केल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
चांदवड : १८४५ मध्ये स्थापन झालेल्या शहरातील सर्वात जुनी असलेल्या पुरातन रंगमहालातील जिल्हा परिषदेच्या ‘दगडी शाळे’ने कात टाकली असून, माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत शाळेला डिजिटल केल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. मध्यंतरीच्या काळात या शाळेकडे कोणी ढुंकूनही बघत नव्हते. शालेय कामकाज इंग्रजी व महागडे शिक्षण सुरू झाल्याने आपला पाल्य चांगल्या उच्च दर्जाच्या शाळेत टाकल्याने या शाळेकडे फारसे विद्यार्थी शिक्षणासाठी येत नव्हते, तर जिल्हा परिषद व शासनाचेही अशा गरीब शाळेकडे फारसे लक्ष नव्हते. या दगडी म्हणजे दगडात बांधलेल्या शाळेकडे लक्ष नाही, त्यामुळे तिचे अनेक वर्ग पडके झाले होते. वर्ग खोल्या गळत होत्या, खिडक्यांची तावदाने तुटली होती. असे असताना अचानक गावातील माजी विद्यार्थी व शाळेविषयी जिव्हाळा असणाऱ्या नागरिकांनी एकत्र येऊन दि. ६ जानेवारी २०१८ रोजी माजी विद्यार्थी मेळावा भरवून शाळा विकासाकडे लक्ष देण्याचे ठरविले. माजी विद्यार्थ्यांनी लोकसहभागातून शाळा डिजिटल होऊ शकते ही सूचना मांडली. त्यानंतर जिल्हा परिषदेतील शिक्षक माजी विद्यार्थी संदीप महाले, मुख्याध्यापक अशोक वाघ, शांताराम हांडगे, खंडू सोनवणे यांनी लोकवर्गणीतून शाळा डिजिटल करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यानंतर दररोज सायंकाळी शाळा सुटल्यावर प्रत्येक माजी विद्यार्थ्याकडे जाऊन पाठपुरावा करत रोख रक्कम व वस्तुरूपाने मदत जमा केली. गावातील माजी विद्यार्थी आपल्या परिवारातील वाढदिवसानिमित्त शाळेला मदत करीत असल्याने या दगडी शाळेने कात टाकली आहे.