सामान्य रुग्णालयाचे प्रश्न सोडवू
By admin | Published: July 9, 2017 12:05 AM2017-07-09T00:05:27+5:302017-07-09T00:05:44+5:30
मालेगाव : तीन महिलांचा मृत्यू झाला असून, सदर प्रश्न सुटत नसल्याने उद्रेक होईल, असे प्रतिपादन राज्यमंत्री दादा भुसे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : येथील सामान्य रुग्णालयात महिला वैद्यकीय अधिकारी नसल्याने उपचाराअभावी तीन महिलांचा मृत्यू झाला असून, वारंवार बैठका घेऊनही सदर प्रश्न सुटत नसल्याने नागरिकांचा उद्रेक होईल, असे प्रतिपादन ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी केले.
येथील सामान्य रुग्णालयात झालेल्या रुग्ण कल्याण समितीच्या बैठकीत ग्रामविकास राज्यमंत्री भुसे बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी तथा रुग्ण कल्याण समिती अध्यक्ष अजय मोरे होते.
रात्री-अपरात्री महिला डॉक्टर नसल्याने उपचार मिळत नाही. सामान्य रुग्णालयात शस्त्रक्रिया न करता खासगी रुग्णालयात रुग्णांना पाठवून शस्त्रक्रिया केल्या जात असल्याबद्दल भुसे यांनी जाब विचारला असता आयसीयू सेटअप नसल्याचे संबंधित डॉक्टरांनी सांगितले. एप्रिल आणि मे मध्ये ६९ आणि या महिन्यात ५२ शस्त्रक्रिया झाल्या. नर्सिंग कॉलेजसाठी अडीच कोटींची गरज असून, आॅगस्टपासून नर्सिंग कॉलेज सुरू होण्याची शक्यता असल्याचे राज्यमंत्री भुसे यांनी सांगितले. सिटीस्कॅन मंजूर असून ते कार्यान्वित नाही. २ हजार १३१ रुग्णांना सिटीस्कॅनसाठी बाहेर पाठविण्यात आले, तर सोनोग्राफीसाठी रुग्णांना बाहेर पाठविले जात असल्याचे निदर्शनास आले. सामान्य रुग्णालयातील रिक्त पदांसह सर्व प्रश्न संबंधितांकडे पाठवून त्वरित सोडवू, असे आश्वासन भुसे यांनी दिले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर डांगे यांनी रुग्णालयात सिव्हिल सर्जन चिकित्सक, दंत शल्य चिकित्सक, स्त्रीरोग तज्ज्ञ यांची पदे रिक्त असल्याचे सांगितले. औषधनिर्माण अधिकारी सेवानिवृत्त झाल्याने सदर पदास मान्यता मिळावी अशी विनंती केली. संबंधित वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांना उपचारार्थ बाहेर खासगी रुग्णालयात पाठविले जाते. दरम्यान, ग्रामविकास राज्यमंत्री भुसे यांनी बैठकीतूनच जिल्हाधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून सामान्य रुग्णालयाचे प्रश्न सोडविण्याचे आदेश दिले. वैद्यकीय अधिकारी डॉ. डांगे यांना सामान्य रुग्णालयातील रिक्त पदांसह आवश्यक मागण्यांचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश देऊन शासन पातळीवरून समस्या सोडविण्याचे आश्वासन भुसे यांनी दिले. यावेळी प्रांताधिकारी अजय मोरे, पोलीस उपअधीक्षक गजानन राजमाने, डॉ. भीमराव त्रिभुवन, प्रमोद शुक्ला, राजेश अलीझाड, पंचायत समिती सभापती प्रतिभा सूर्यवंशी, दत्ता चौधरी आदि उपस्थित होते.