कोरोनातून सावरलेल्या काही बालकांना एमएसआयसी आजाराचा धोका !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:11 AM2021-07-01T04:11:44+5:302021-07-01T04:11:44+5:30
नाशिक : कोरोनातून बरे झालेल्या काही नागरिकांना मल्टी सिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोमनामक आजाराने ग्रासले असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रात त्याची ...
नाशिक : कोरोनातून बरे झालेल्या काही नागरिकांना मल्टी सिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोमनामक आजाराने ग्रासले असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रात त्याची उदाहरणे तुरळक असली तरी कोणत्याही आजाराची व्याप्ती कधीही वाढत असण्याच्या सध्याच्या काळात या नवीन आजाराचा धोका नाकारता येत नाही.
जगभरात कोरोनाचे थैमान अद्यापही सुरू आहे. करोनाच्या संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी आणि त्याच्यावर उपचार शोधण्याचे प्रयत्न जगभरात सुरू असताना आणखी एका आजाराचा संसर्ग फैलावत आहे. अमेरिका आणि युरोपमधील काही देशांमध्ये हा आजार फैलावत असल्याचे समोर आले आहे. पीडिएट्रिक मल्टिसिस्टीम इनफ्लेमेंट्री सिंड्रोम असे या आजाराला नाव देण्यात आले आहे. या आजाराचा आणि कोरोनाचा संबंध दिसून येत आहे. जगातील विविध देशांमध्ये, तसेच उत्तर भारतात अनेकांना आजाराचा सामना करावा लागत आहे. रुग्णांना अनेक दिवस ताप असतो. पोटात दुखणे आणि सारखी उलटी होत असल्याची लक्षणे आढळली असल्याचे सांगण्यात आले आहे. काही रुग्णांमध्ये टॉक्सिक शॉक सिंड्रोमसारखी लक्षणे आढळत आहेत. पोटदुखी, अतिसार आणि उलटीचा त्रास जाणवतो. त्याशिवाय छातीत प्रचंड जळजळ होते.
इन्फो
कोरोनामुळे अन्य आजारांची निर्मिती
कोरोना हा केवळ एक आजार असल्याचे सांगितले जात असले तरी अनेक प्रकरणांमध्ये विविध प्रकारचे आजार हळूहळू जगासमोर येऊ लागले आहेत. विशेषत्वे कोरोना होऊन गेल्यानंतर मधुमेही रुग्णांना होणाऱ्या म्युकर मायकोसिसच्या आजाराने तर कोरोना होऊन गेलेले मधुमेही रुग्णांना धडकीच भरवली होती. त्यात अनेक रुग्णांनी जीव गमावल्याने तर म्युकर मायकोसिसची प्रचंड दहशत निर्माण झाली होती. त्यात आता हा एमएसआयसीसारखा आजार बालकांना होऊ लागल्याने पालकांना या आजाराची धास्ती अधिकच वाटू लागली आहे.
--------------------------
अशी आहेत लक्षणे
मुलांना खूप ताप येणे. तो पाच दिवसांपर्यंत कमी न होणे.
मुलांच्या सतत पोटात दुखणे.
मळमळ, उलट्या होणे.
त्वचेवर रॅशेस येणे
डोळे लाल होणे
-----------------------------------
इन्फो
ही काळजी अत्यावश्यक
मुलांना मास्कशिवाय बाहेर पडू देऊ नका
कुठलेही लक्षण आढळल्यास तातडीने डॉक्टरांना दाखवा
कोरोनातून बरे झालेल्या मुलांकडेही लक्ष ठेवावे
-------------------
कोट
जिल्ह्यात कोरोनापश्चात उद्भवणाऱ्या आजारांसाठीदेखील सर्व प्रकारची सज्जता करण्यात येत आहे. जिल्ह्यात एमएसआयसीचे किती रुग्ण आढळले आहेत, त्याची माहिती संकलित करण्यात येत आहे.
डॉ. अशोक थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक