शहर अभियंत्यासह काही अधिकारी रडारवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 12:48 AM2018-11-29T00:48:51+5:302018-11-29T00:49:25+5:30
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर आता त्यांच्या मर्जीतील अधिकारी लोकप्रतिनिधींच्या रडारवर आले आहेत. महापालिकेचे शहर अभियंता संजय घुगे यांच्यावर स्वागत हाइट प्रकरण गाजण्याची शक्यता असून, त्यांच्या कार्यकाळातील सर्व पूर्णत्वाच्या दाखल्यांची चौकशी करावी तसेच त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक मुकेश शहाणे आणि संतोष गायकवाड यांनी केली आहे.
नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर आता त्यांच्या मर्जीतील अधिकारी लोकप्रतिनिधींच्या रडारवर आले आहेत. महापालिकेचे शहर अभियंता संजय घुगे यांच्यावर स्वागत हाइट प्रकरण गाजण्याची शक्यता असून, त्यांच्या कार्यकाळातील सर्व पूर्णत्वाच्या दाखल्यांची चौकशी करावी तसेच त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक मुकेश शहाणे आणि संतोष गायकवाड यांनी केली आहे.
आयुक्तांच्या बदलीनंतर अधिकाऱ्यांनादेखील आता हिशेब चुकते करावे लागण्याची चिन्हे आहेत. महापालिकेचे शहर अभियंता संजय घुगे सध्या अशाच प्रकारे धारेवर धरले जात आहेत. नगररचना विभागाचे कार्यकारी अभियंता म्हणून कामकाज करीत असताना त्यांनी अनेक प्रकारच्या चुकीचे पूर्णत्वाचे दाखले दिले असून, अनेक प्रकरणात महापालिकेचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नगररचनातील त्यांच्या कारकिर्दीची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी शहाणे यांनी दिली आहे. तर स्वागत हाइट या इमारतीला घुगे यांनीच पूर्णत्वाचा दाखला दिला आणि आता नंतर तीच इमारत बेकायदेशीर ठरवल्याने त्यांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी संतोष गायकवाड यांनी केली आहे.
कामगारनगरजवळ असलेल्या या इमारतीची उंची वाढली आहे, तसेच विकासकामे करताना अनधिकृत गाळा काढून तो विकला आहे. इमारतीचे कमिंसमेंट मंजूर नकाशा आणि प्रत्यक्षातील बांधकाम यात फरक असून, या सर्व प्रकाराचा परिणाम म्हणून इमारत बेकायदेशीर ठरविण्यात आल्याने गेल्या तीन महिन्यांपासून महापालिकेने पाणीपुरवठाच खंडित केला आहे. नगररचना अभियंता असताना घुगे यांच्या कारकिर्दीत हा प्रकार घडला असल्याने त्यांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी संतोष गायकवाड यांनी केली आहे.