रेव्ह पार्टीमधील आणखी काही संशयित फरारच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 01:28 AM2021-06-30T01:28:08+5:302021-06-30T01:30:36+5:30
वैद्यकीय चाचणीदरम्यान संकलित केलेले रक्त, लघवीचे नमुने प्रयोगशाळेकडे पाठविले गेले आहे..., या नमुन्यांचा तपासणी अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही...तसेच काही संशयित अद्यापही फरार असून, त्यांचा शोध घेतला जात आहे. नायजेरियन व्यक्तीने पुरविलेल्या कोकेनसारखे अमली पदार्थ कुठून मिळविले याचाही तपास अद्याप सुरू आहे....’अशाप्रकारे सरकारपक्षाकडून इगतपुरीमधील हवाईयन रेव्ह पार्टीच्या गुन्ह्यात न्यायालयाकडे संशयितांची पोलीस कोठडी वाढविण्याची मागणी करण्यात आली.
नाशिक : वैद्यकीय चाचणीदरम्यान संकलित केलेले रक्त, लघवीचे नमुने प्रयोगशाळेकडे पाठविले गेले आहे..., या नमुन्यांचा तपासणी अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही...तसेच काही संशयित अद्यापही फरार असून, त्यांचा शोध घेतला जात आहे. नायजेरियन व्यक्तीने पुरविलेल्या कोकेनसारखे अमली पदार्थ कुठून मिळविले याचाही तपास अद्याप सुरू आहे....’अशाप्रकारे सरकारपक्षाकडून इगतपुरीमधील हवाईयन रेव्ह पार्टीच्या गुन्ह्यात न्यायालयाकडे संशयितांची पोलीस कोठडी वाढविण्याची मागणी करण्यात आली. न्यायालयाने युक्तिवाद ग्राह्य धरत या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत २५ संशयितांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
एका दिवसाच्या कोठडीची मुदत संपत असल्याने इगतपुरी पोलीसांनी २९ संशयितांपैकी उर्वरित बॉलिवूड अभिनेत्री संशयित हिना पांचाल, श्रृती शेट्टी, चांदणी भटिजा, ऋचिका नार्वेकर, ज्योती नाईक, करिश्मा शेट्टी, प्रीती चौधरी, शयाना लांबा, अशिता शर्मा, सिना गबलानी, विभा गोंडोलीया यांसह एकूण १२ महिला व संशयित अमित लाट, आशिष लाट, राजेश त्रिवेदी, विशाल मेहता, अबुबकर शेख, रोहित अरोरा, सुशांत सावंत, संदीप भोसले, राकेश कांगो, फैजान बेग, इराणी अझार फारनुद, दानिश खान, राजू मगरे, भगवान माळी यांसह १३ संशयित असे एकूण २५ संशयित आरोपींना इगतपुरी न्यायालयात मंगळवारी पोलिसांनी हजर केले.
दरम्यान, या सर्वांकडून वकिलाने न्यायालयाकडे जामीन अर्ज केला; मात्र न्यायालयाने तो फेटाळून लावला आणि यांना येत्या ५ जुलैपर्यंत पोलीस कोठवडी सुनावली. एनडीपीएसच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी बर्थ-डे बॉय पीयूष शेठीया, हर्ष शहा, निरज सुराना, नायझेरीयन नागरिक उमाही पीटर यांची न्यायालयाने सोमवारीच नऊ दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. सरकार पक्षाकडून ॲड. मिलिंद निर्लेकर यांनी युक्तिवाद
केला.
रणवीर सोनी आज न्यायालयात
ज्या दोन बंगल्यांमध्ये तीन दिवसीय रेव्ह पार्टी रंगविण्याचा बेत आखला गेला होता. त्या बंगल्यांचा मालक रणवीर सोनी यास पोलिसांनी मुंबईतून मंगळवारी (दि.२९) ताब्यात घेतले. त्यास संध्याकाळी इगतपुरी पोलीस ठाण्यात अटक दाखविण्यात आले. बुधवारी (दि.३०) सोनी यास इगतपुरी न्यायालयात हजर केले जाणार आहे.
दृष्टिक्षेपात युक्तिवाद
घटनास्थळावरील परिस्थितीजन्य पुरावे यावेळी पोलिसांनी न्यायालयात सादर केले. यामधून अमली पदार्थांचे सर्रास सेवन केले जात असल्याचे दिसून येते. तसेच एका तरुणीच्या खिशात ड्रग्जदेखील पोलिसांना अंगझडतीत मिळून आले असून, त्याचाही तपास सुरू असल्याचे सरकारपक्षाकडून सांगण्यात आले.