'काही लोकांनी भगवा ध्वज केवळ मिरवला; तो जपण्याची जबाबदारी भाजपची'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 01:32 PM2022-02-22T13:32:35+5:302022-02-22T13:32:57+5:30
नाशिकमधील भाजप कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना फडणवीस म्हणाले, राज्याची अवस्था सध्या काय आहे, कोण राज्यकर्ते आहेत हेच समजत नसून, सरकारचे अस्तित्वच दिसत नाही...
नाशिक/औरंगाबाद - काही लोकांनी केवळ भगवा ध्वज मिरवला; परंतु त्यानंतर ते कोणा-कोणासोबत जातात हे साऱ्यांनीच पाहिले आहे. त्यामुळे भगवा फडकाविण्याची व जपण्याची जबाबदारी भाजपवरच असल्याची टीका भाजप नेते व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे नाव न घेता केली आहे.
नाशिकमधील भाजप कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना फडणवीस म्हणाले, राज्याची अवस्था सध्या काय आहे, कोण राज्यकर्ते आहेत हेच समजत नसून, सरकारचे अस्तित्वच दिसत नाही. सरकारचे फक्त मुंबई पालिकेवर लक्ष असून, मुंबई महापालिका म्हणजेच राज्य आहे अशा अविर्भावात सरकार चालविले जात आहे.
तत्पूर्वी औरंगाबादमध्ये चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर पत्रकारांशी बोलतानाही फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. महाराष्ट्रात कोण सुडाचे राजकारण करत आहे, राज्यात काय चाललं आहे, हे सगळ्यांना दिसते आहे. कुणी कितीही भाजपविरोधात हातात हात घालून आघाड्या तयार केल्या तरी आगामी काळात भाजपच ‘नंबर एक’चा पक्ष असेल, असा दावा फडणवीस यांनी यावेळी केला.