‘रेव्ह पार्टीशी संबंधित काही संशयित फरारच’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:10 AM2021-06-30T04:10:51+5:302021-06-30T04:10:51+5:30
एका दिवसाच्या कोठडीची मुदत संपत असल्याने इगतपुरी पोलीसांनी २९ संशयितांपैकी उर्वरित बॉलिवूड अभिनेत्री संशयित हिना पांचाल, श्रृती शेट्टी, चांदणी ...
एका दिवसाच्या कोठडीची मुदत संपत असल्याने इगतपुरी पोलीसांनी २९ संशयितांपैकी उर्वरित बॉलिवूड अभिनेत्री संशयित हिना पांचाल, श्रृती शेट्टी, चांदणी भटिजा, ऋचिका नार्वेकर, ज्योती नाईक, करिश्मा शेट्टी, प्रीती चौधरी, शयाना लांबा, अशिता शर्मा, सिना गबलानी, विभा गोंडोलीया यांसह एकूण १२ महिला व संशयित अमित लाट, आशिष लाट, राजेश त्रिवेदी, विशाल मेहता, अबुबकर शेख, रोहित अरोरा, सुशांत सावंत, संदीप भोसले, राकेश कांगो, फैजान बेग, इराणी अझार फारनुद, दानिश खान, राजू मगरे, भगवान माळी यांसह १३ संशयित असे एकूण २५ संशयित आरोपींना इगतपुरी न्यायालयात मंगळवारी पोलिसांनी हजर केले. दरम्यान, या सर्वांकडून वकिलाने न्यायालयाकडे जामीन अर्ज केला; मात्र न्यायालयाने तो फेटाळून लावला आणि यांना येत्या ५ जुलैपर्यंत पोलीस कोठवडी सुनावली. एनडीपीएसच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी बर्थ-डे बॉय पीयूष शेठीया, हर्ष शहा, निरज सुराना, नायझेरीयन नागरिक उमाही पीटर यांची न्यायालयाने सोमवारीच नऊ दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. सरकार पक्षाकडून ॲड. मिलिंद निर्लेकर यांनी युक्तिवाद केला.
--इन्फो--
युक्तिवाद दृष्टिक्षेपात
घटनास्थळावरील परिस्थितीजन्य पुरावे यावेळी पोलिसांनी न्यायालयात सादर केले. यामधून अमली पदार्थांचे सर्रास सेवन केले जात असल्याचे दिसून येते. तसेच एका तरुणीच्या खिशात ड्रग्जदेखील पोलिसांना अंगझडतीत मिळून आले असून, त्याचाही तपास सुरू असल्याचे सरकारपक्षाकडून न्यायालयात सांगण्यात आले.
--इन्फो--
रणवीर सोनी आज न्यायालयात
ज्या दोन बंगल्यांमध्ये तीन दिवसीय रेव्ह पार्टी रंगविण्याचा बेत आखला गेला होता. त्या बंगल्यांचा मालक रणवीर सोनी यास पोलिसांनी मुंबईतून मंगळवारी (दि.२९) ताब्यात घेतले. त्यास संध्याकाळी इगतपुरी पोलीस ठाण्यात अटक दाखविण्यात आले. बुधवारी (दि.३०) सोनी यास इगतपुरी न्यायालयात हजर केले जाणार आहे.