राज्यातील काही टोलनाके बंद

By admin | Published: June 1, 2015 01:15 AM2015-06-01T01:15:02+5:302015-06-01T01:18:27+5:30

राज्यातील काही टोलनाके बंद

Some toll booths in the state are closed | राज्यातील काही टोलनाके बंद

राज्यातील काही टोलनाके बंद

Next

नाशिक : राज्य सरकारने राज्यातील काही टोलनाके बंद केले; मात्र याबाबत अद्यापही पारदर्शकता नाही. मोठ्या रस्त्यांवरील टोल बंद होणे अपेक्षित होते, शिवाय कमी खर्चाच्या लहान रस्त्याला टोल लावताच कामा नये. सरकारने जरी काही टोलनाक्यांवरील ‘वसुली’ थांबविली असली, तरी या टोलमुक्तीबाबत समाधानी नसल्याचे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नाशिक दौऱ्यावर बोलून दाखविले. टोलमुक्त महाराष्ट्रासाठी ‘मनसे’ने छेडलेले आंदोलन विसरून चालणार नाही, असेही ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
राज्य शासनाने सोमवार (दि.१) पासून राज्यातील बारा टोलनाके पूर्णपणे बंद करण्याचा आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाने काढला आहे. तसेच ५३ नाक्यांवर कार, जीप आणि एस.टी. बसेसना सूट दिली जावी, अशी सूचना शासनाने केली आहे. या माध्यमातून महाराष्ट्र टोलमुक्त करण्याच्या दिशेने राज्य सरकारचे हे पहिले पाऊल आहे. शासनाच्या या निर्णयाबाबत पत्रकारांनी ठाकरे यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, ‘मनसे’ने महाराष्ट्र टोलमुक्त करण्यासाठी राज्यभर आंदोलने केली, कार्यकर्त्यांना पोलिसांच्या लाठ्या-काठ्यांचा मार खाऊन तुरुंगात जावे लागले व अनेकांवर खटले भरले गेले. त्यामुळे मनसेचा ‘टोल’ला ‘टोला’ आंदोलन महाराष्ट्र विसरू शकत नाही. शासनाने बारा टोलनाके बंद केल्याबद्दल सरकारचे अभिनंदन; मात्र टोलमुक्त महाराष्ट्रासाठी सरकारने केलेला हा प्रयत्न पाहिजे तसा भरीव नसून, याबाबत आपण समाधानी नसल्याचे त्यांनी सांगितले. ज्या रस्त्यांच्या बांधकामासाठी अत्यंत कमी खर्च आला त्या रस्त्यांवर टोलनाके हवेत कशाला, हाच प्रश्न ‘मनसे’चा आहे. या आग्रही मागणीसाठी आम्ही आंदोलने केली, असे ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. टोलनाके शासनाने पारदर्शक करावे. तेथील कॅश पेमेंटची प्रक्रिया बंद करावी आणि सर्वाधिक होणारी टोलनाक्यांवरील पैशांची उधळण थांबवावी, हीच प्रमुख मागणी असल्याचे ठाकरे म्हणाले. टोलमधून होणाऱ्या रोखीच्या व्यवहारांची टक्केवारी अनाकलनीय असल्याचे सांगत, या माध्यमातून कोणाला किती ‘उत्पन्न’ मिळते अन् सरकारच्या तिजोरीत काय जाते, याबाबत शंकाच आहे. टोलचे रोखीचे व्यवहार बंद होत नाही तोपर्यंत समाधानी होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Some toll booths in the state are closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.