कोणी परिचर ते कोणी थेट कनिष्ठ अभियंत्याच्या खुर्चीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:17 AM2021-09-22T04:17:36+5:302021-09-22T04:17:36+5:30
गेल्या वर्षीही जिल्हा परिषदेने अशाच प्रकारे अनुकंपा तत्वावर ज्येष्ठता यादीवर असलेल्या सुमारे १२१ वारसांना सेवेत सामावून घेतले होते. तरी ...
गेल्या वर्षीही जिल्हा परिषदेने अशाच प्रकारे अनुकंपा तत्वावर ज्येष्ठता यादीवर असलेल्या सुमारे १२१ वारसांना सेवेत सामावून घेतले होते. तरी देखील जवळपास २१० वारस प्रतीक्षा यादीत असल्याने त्यांनी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा सुरू ठेवला होता. जिल्हा परिषदेच्या सेवेत जवळपास ४० टक्के जागा रिक्त असून, त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे अन्य कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. मात्र शासनाकडून कर्मचारी भरती होत नसल्याने कामकाज करतांना मोठ्या अडचणी निर्माण होत असल्याचे पाहून जिल्हा परिषद प्रशासनाने अनुकंपा भरतीसाठी शासनाची अनुमती घेतली व त्यानुसार एकूण रिक्त जागांच्या दोन टक्के जागा अनुकंपा तत्वावर भरण्यास मान्यता मिळाल्याने त्याबाबतची कार्यवाही मंगळवारी (दि. २१) पूर्ण करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी या संदर्भात लक्ष घातले. सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंदराव पिंगळे यांनी रिक्त असलेल्या जागा, उमेदवाराची शैक्षणिक पात्रता याचा मेळ घालून एकाच दिवशी नियुक्ती व रिक्त जागांवर नेमणुकीची प्रक्रिया पार पाडली. त्यात परिचर संवर्गातून ९१, प्रयोगशाळा तंत्रज्ञ-०४, औषध निर्माण अधिकारी- ०४, आरोग्य सेवक- ३, कनिष्ठ अभियंता- २, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक- ५, कनिष्ठ अभियंता-१, पर्यवेक्षिका-१, पशुधन पर्यवेक्षक- १, वरिष्ठ सहाय्यक लेखा-७, कनिष्ठ सहाय्यक लेखा- २, प्राथमिक शिक्षक- १७ व विस्तार अधिकारी १ अशा एकूण १३९ उमेदवारांचा समावेश आहे. याच वेळी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून १० टक्के या प्रमाणे २५ आरोग्य सेवक व ७ ग्रामसेवकांना समुपदेशनाने त्यांच्या इच्छित स्थळी नियुक्तीचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिले.
चौकट===
अनेकांच्या भावनांना वाट
गेल्या अनेक वर्षापासून शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या संधीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांना मंगळवारी जिल्हा प्रशासनाकडून थेट नियुक्ती व नेमणूक जागेवरच देण्यात आल्याने अनेकांची इच्छा पूर्ण झाल्याने त्यांच्या भावना अनावर झाल्याचे यावेळी दिसून आले. तर, काहींच्या चेहऱ्यावर शासकीय नोकरीत सामावण्याचा आनंदही ओसंडून वाहत होता.