कुणी सेफ्टी पिन गिळली, कुणी नाणे, कुणी नाकात घातला शेंगदाणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:19 AM2021-09-07T04:19:06+5:302021-09-07T04:19:06+5:30
नाशिक : जिल्हा रुग्णालयात एक ते पाच वर्षांच्या मुलांमध्ये कुणी नाणे गिळले, कुणी सेफ्टी पिन गिळली, कुणाच्या श्वासनलिकेत बेदाणा ...
नाशिक : जिल्हा रुग्णालयात एक ते पाच वर्षांच्या मुलांमध्ये कुणी नाणे गिळले, कुणी सेफ्टी पिन गिळली, कुणाच्या श्वासनलिकेत बेदाणा अडकला, तर कुणाच्या नाकात शेंगदाणा अडकल्याची समस्या घेऊन नेहमीच अनेक पालक तातडीने धाव घेत असतात. त्यात काही बालकांना जीव गमवावा लागल्याचेही प्रकार घडले असल्याने पालकांनी दक्षता घेणे अत्यावश्यक असते.
चव आणि नवीन गोष्टींचा वापर जाणून घेण्याच्या उत्सुकतेपोटी अनेकदा ही मुले द्राक्षे, मनुका, काजू, नाणे, गोटी, सेफ्टी पिन, लहान खेळणी, फुगे, मणी गिळल्याने घशात किंवा श्वासनलिकेत अडकण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे नवजात अर्भकापासून किमान पाच वर्षांच्या बालकांपर्यंत पालकांना अत्यंत काळजी घेणे आवश्यक असते.
मुले काय करतील याचा नेम नाही
पाच वर्षांपेक्षा लहान मुले अनेकदा खेळताना शेंगदाणे, खेळणी किंवा प्लास्टिकचे तुकडे गिळतात, त्यामुळे त्यांना श्वास घेण्यात अडचणी येतात. अनेकदा अशा वस्तू अन्ननलिकेवाटे जातात. मात्र, जर अशा वस्तू श्वासनलिकेत गेल्यास श्वास घेण्यास अडचण निर्माण होत असल्याने ती एक अत्यंत धोकादायक परिस्थिती असते.
पालकांनी लहान मुलांना खाण्यासाठी शेंगदाण्यासारखे कडक पदार्थ देऊ नयेत. कोणतीही लहान खेळणी मुलांना देऊ नयेत. खेळण्यांचा आकार मुलांच्या तोंडाच्या आकारापेक्षा मोठा असल्याची खात्री करूनच ते खेळणे बालकास देणे आवश्यक ठरते.
सात शस्त्रक्रिया झाल्या गत महिनाभरात
जिल्हा रुग्णालयासह शहरातील ईएनटी रुग्णालयांमध्ये गत महिनाभरात अशा स्वरूपाच्या सात शस्त्रक्रिया झाल्या असून, या बालकांचा जीव वाचविण्यात यश आले आहे. मात्र, त्यातील दोन बालकांची स्थिती गंभीर झाली होती.
मुलाला खोकला काढायला सांगावे. नाकाने श्वास आत ओढण्याचे टाळून तोंडाने श्वास घ्यायला सांगावे.
कुठल्या नाकपुडीत वस्तू अडकली आहे हे नक्की माहीत असेल तर त्याच्या शेजारील नाकपुडीवर बोट ठेवून श्वास बाहेर सोडायला सांगावा.
कुठल्याच उपायांचा फायदा होत नसेल तर त्वरित वैद्यकीय मदत घेण्याचा प्रयत्न करावा.
वस्तू बाहेर निघाली असेल तरी नंतरचे काही दिवस खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा श्वासाचा आवाज येणे, ताप यासारख्या लक्षणांवर लक्ष ठेवावे. कारण क्वचित एखादा तुकडा आत जाऊन न्यूमोनिया व्हायची शक्यता असते.
-------------------
लहान मुलांना अन्नपदार्थ शिजवून किंवा योग्य आकारात कापून देऊन योग्य प्रकारे चावून खायला शिकवले पाहिजे. जेवण करताना मुलांचे बोलणे, हसणे किंवा खेळणे बंद करणे आवश्यक आहे. पालकांनी सावध राहावे आणि मुलांनी तोंडात काही ठेवले आहे का, याकडे लक्ष द्यावे. शिटी, मोती, फुगे, आदी लहान खेळणी मुलांना देऊ नयेत. मुलांच्या हाताच्या टप्प्यात तोंडात, नाकात अडकू शकेल अशी वस्तूच न ठेवण्याची दक्षता घ्यायला हवी.