सोमेश्वर धबधबा खळाळला; पर्यटकांची गर्दी

By admin | Published: February 19, 2017 09:58 PM2017-02-19T21:58:22+5:302017-02-19T21:58:22+5:30

गंगापूर धरणातून रविवारी (दि.१९) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास पाचशे क्युसेक पाण्याचा नदीपात्रात विसर्ग करण्यात आला.

Someshwar Falls Falls; Crowd of tourists | सोमेश्वर धबधबा खळाळला; पर्यटकांची गर्दी

सोमेश्वर धबधबा खळाळला; पर्यटकांची गर्दी

Next




नाशिक :
एकलहरा औष्णिक विद्युत केंद्रावर होणाऱ्या विद्युत निर्मितीसाठी गंगापूर धरणातून रविवारी (दि.१९) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास पाचशे क्युसेक पाण्याचा नदीपात्रात विसर्ग करण्यात आला. यामुळे नाशिककरांच्या पसंतीचा सोमेश्वर धबधबा खळाळला.


पावसाळा संपल्यानंतर सुमारे चार महिन्यांपासून सोमेश्वर धबधबा कोरडाठाक पडला होता. तसेच गोदापात्रातील पाण्याची पातळी कमी झाल्याने आनंदवलीपासून घारपुरे घाटापर्यंत नदीपात्राच्या पाण्याची पातळी कमालीची घसरली होती. यामुळे रामकुंड, टाळकुटेश्वर, रोकडोबा पटांगणाजवळ नदीपात्रात गाळ साचून मोठ्या प्रमाणात दुर्गंधीयुक्त पाणी वाहत होते. दुपारी पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने सोमेश्वर धबधबा वाहू लागला. धबधब्याचे छायाचित्र सोशल मिडियावरून व्हायरल झाल्याने नाशिककरांनी रविवारची रम्य संध्याकाळ सोमेश्वर धबधब्यावर घालविली. तरुण-तरुणींनी सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली होती.


शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेला सोमेश्वर धबधबा हा नाशिककरांच्या पसंतीचा राहिला आहे. शहरालगतचा हा एकमेव जवळचा धबधबा असून पावसाळ्यामध्ये तसेच उन्हाळ्यातही गंगापूर धरणाच्या विसर्गावर हा धबधबा वाहताना नागरिकांना बघता येतो. मोठ्या खडकावरून पडणाऱ्या पाण्याच्या लाटा डोळे दिपविणाऱ्या असतात तसेच धबधब्याचे तुषार अंगावर झेलण्यासाठी खडकाळ पायऱ्या नदीपात्रात असल्याने पर्यटक या पायऱ्यांवरून खाली उतरतात. यावेळी वाऱ्याच्या साहाय्याने पाण्याचे अंगावर येणारे तुषार अनुभवण्याची मजा काही औरच असते.

Web Title: Someshwar Falls Falls; Crowd of tourists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.