नाशिकचे सोमेश्वर मंदीर : १०८ बाल तबलावादकांचा ‘ताल नम:शिवाय’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 02:43 PM2018-02-13T14:43:14+5:302018-02-13T14:52:27+5:30
सकाळपासून भाविकांची दर्शनसाठी गर्दी होत आहे. गोदाकाठालगत वसलेले गंगापूर शिवारातील सोमेश्वर महादेव मंदिर हे प्रसिध्द देवस्थान असून भाविकांचे मोठे श्रध्दास्थान आहे.
नाशिक : महाशिवरात्रीनिमित्त नाशिक येथील सोमेश्वर मंदीरात महाशिवरात्रीनिमित्त सकाळपासून भाविकांची दर्शनासाठी रिघ लागली आहे. मंदिरात विश्वस्त मंडळाकडून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सकाळी १०८ बाल तबलावादकांनी सामुहिकरित्या तबलावादन करत ‘ताल नम:शिवाय’ सादर केला.
सोमेश्वर महादेव मंदिर संस्थानावर नियुक्त करण्यात आलेल्या नव्या विश्वस्त मंडळाची पहिली महाशिवरात्री असून मंडळाने विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहे. मंदिरावर रोषणाई करण्यात आली असून परिसर सुशोभित करण्यात आला आहे. सकाळपासून भाविकांची दर्शनसाठी गर्दी होत आहे. गोदाकाठालगत वसलेले गंगापूर शिवारातील सोमेश्वर महादेव मंदिर हे प्रसिध्द देवस्थान असून भाविकांचे मोठे श्रध्दास्थान आहे. सकाळी पाच वाजता मंदिरात पारंपरिक पध्दतीने अध्यक्ष प्रमोद गोरे, गोकुळ पाटील, अॅड. बापुसाहेब गायकर, भिमराव पाटील आदि विश्वस्त मंडळाच्या उपस्थितीत महाभिषेकाचा सोहळा पार पडला.
त्यानंतर १०८ बाल तबलावादकांनी एकत्र येऊन तबल्यावर नम:शिवायचा ताल धरला. सुमारे तासभर तबालावादकांनी सामुहिकरित्या तबलावादन सादर क रत भाविकांचे लक्ष वेधले. सकाळी नऊ वाजेपासून भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येत आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत भाविकांना महाप्रसादाचा लाभ घेता येणार असल्याचे मंडळाने सांगितले. संध्याकाळी सात वाजता मंदिरात महापूजेला पर्यटनमंत्री जयकुमार रावल हे देखील उपस्थित राहणार असल्याचे विश्वस्त मंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे. तसेच जिल्हाधिकारी राधाकृष्णन् बी., धर्मदाय आयुक्त प्रदीप घुगे, उपधर्मादाय आयुक्त दिप्ती कोळपकर हेदेखील महापूजेत सहभागी होणार आहे. दुपारी विभागीय आयुक्त महेश झगडे, पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांच्या हस्ते पुजा पार पडली.
संध्याकाळी नंदकुमार देशपांडे प्रस्तुत ‘स्वरगंगा’ हा मराठी भक्तीगीतांचा कार्यक्रम मंदिराच्या आवारात होणार आहे.