ज्या मुलाला लहानाचे मोठे केले त्यानेच जन्मदात्या बापाचा घात केला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 02:20 PM2019-03-28T14:20:03+5:302019-03-28T14:25:01+5:30
भगवान एडके यांच्या डोक्यात पहाटेच्या सुमारास सिध्दार्थ याने दगडी पाटा हाणून ठार मारल्याचे फिर्यादीत किशोर याने म्हटले आहे. रक्ताच्या थारोळ्यात आपल्या पोटच्या मुलाला बघून फिर्यादीच्या आजीने जोरात हंबरडा फोडला.
नाशिक : उपनगर परिसरातील गौतमनगर भागात एडके कुटुंबप्रमुख भगवान नामदेव एडके (६५) यांच्या डोक्यात त्यांचा मोठा मुलगा संशयित सिध्दार्थ एडके याने गुरूवारी (दि.२८) पहाटे पावणेपाच वाजेच्या सुमारास पाटा टाकून खून केल्याची धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी त्याचा धाकटा भाऊ किशोर याने दिलेल्या फिर्यादीवरून उपनगर पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गौतमनगर भागात मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारे एडके कटुंबीय वास्तव्यास आहे. मयत भगवान हे आपल्या आई, दोन मुले, सुना नातवंडांसोबत राहत होते. मोठ्या मुलाच्या खोलीत झोपलेले भगवान एडके यांच्या डोक्यात पहाटेच्या सुमारास सिध्दार्थ याने दगडी पाटा हाणून ठार मारल्याचे फिर्यादीत किशोर याने म्हटले आहे. रक्ताच्या थारोळ्यात आपल्या पोटच्या मुलाला बघून फिर्यादीच्या आजीने जोरात हंबरडा फोडला असता फिर्यादी किशोर हा खोलीत धावून आला. त्यावेळी सिध्दार्थ याच्या हात रक्ताने माखलेले होते व त्याने आजीला मारहाण करून जखमी केले . त्याने किशोरवरदेखील चाल करत मारहाण करण्याचा प्रयत्न केला. सिध्दार्थ हा नेहमीच त्याच्या वडिलांसमवेत अनैतिक संबंधाच्या संशयावरून वाद घालत मारहाण करत होता. सुमारे पाच महिन्यांपुर्वीदेखील त्याने काठीने मारहाण करत मयत भगवान यांचे डोके फोडले होते; मात्र त्यांनी त्यावेळी लहान नातवंडांना डोळ्यापुढे ठेवून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास नकार दिला होता. तसेच सिध्दार्थने चार दिवसांपुर्वीच त्यांच्याशी पुन्हा त्याच संशयावरून वाद घालत रात्रीच्या सुमारास हाताने चापटीने मारहाण केली होती, असे फिर्यादीत किशोर याने म्हटले आहे. याप्रकरणी उपनगर पोलिसांनी संशयित आरोपी सिध्दार्थविरूध्द जबर मारहाण, खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच प्रत्यक्षदशाी साक्षीदार मयत भगवान यांच्या आई, भाऊ, सिध्दार्थची पत्नी यांचा जबाबही नोंदविला आहे. याप्रकरणी पुढील तपास उपनगर पोलीस करत आहेत.