सोनईचा तिहेरी हत्याकांड : 6 आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी, क्रूरपणाची ओलांडली परिसीमा - अ‍ॅड. उज्ज्वल निकम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2018 09:09 AM2018-01-18T09:09:11+5:302018-01-18T16:16:45+5:30

अहमदनगर जिल्ह्यातील सोनई पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरंदळे वस्तीवर २०१३ साली जानेवारीच्या एक तारखेला घडलेल्या तिहेरी हत्त्याकांड पुर्वनियोजित कट होता. सहाही दोषी आरोपींनी मानवतेला काळीमा फासणारे कृत्य तर केलेच

sonai murder case nashik court to pronounce the quantum of sentence | सोनईचा तिहेरी हत्याकांड : 6 आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी, क्रूरपणाची ओलांडली परिसीमा - अ‍ॅड. उज्ज्वल निकम

सोनईचा तिहेरी हत्याकांड : 6 आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी, क्रूरपणाची ओलांडली परिसीमा - अ‍ॅड. उज्ज्वल निकम

Next

नाशिक - अहमदनगर जिल्ह्यातील सोनई पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरंदळे वस्तीवर २०१३ साली जानेवारीच्या एक तारखेला घडलेल्या तिहेरी हत्त्याकांड पुर्वनियोजित कट होता. सहाही दोषी आरोपींनी मानवतेला काळीमा फासणारे कृत्य तर केलेच; मात्र क्रूरपणाची सीमाही ओलांडत खूनानंतर मृतदेहाची अवहेलना आणि पोलिसांच्या तपासाला उलटी दिशा देण्याचा केला प्रयत्नाचा गंभीर गुन्हाही केला, असा युक्तीवाद विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी क रत सहाही आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी, अशी न्यायालयाकडे मागणी केली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेत येत्या शनिवारी (दि.२०) या खटल्यामधील दोषींना शिक्षा सुनावली जाणार असल्याचे जाहिर केले.

आरोपींनी पुर्वनियोजित कट केवळ आणि केवळ जातीयव्यवस्थेला महत्त्व देत शिजविला गेल्याचेही यावेळी निकम यांनी न्यायालयापुढे स्पष्ट केले. या दोषींच्या रुपाने भुतलावर राक्षस पहावयास मिळाले. अत्यंत थंड डोक्याने  या दोषींनी कृत्य केले आहे. यावेळी निकम यांनी न्यायालयापुढे विविध तेरा ते पंधरा विशेष कारणे या गुन्ह्यामागील स्पष्ट केली. या सहा आरोपींचा राग सचिनवर होता कारण त्याने एका सवर्णीय मुलीसोबत प्रेम करत तिच्याशी विवाह करण्याचा निश्चय त्याच्या नातेवाईकांकडे त्याने याबाबत बोलणेही केले होते. त्यामुळे खालील जातीचा मुलगा सवर्णीय जातीच्या मुलीसोबत विवाह करणार असल्याचा मनात राग धरून मुलीच्या कुटंबियांमधील दोषी आरोपींनी सचिनचा खून केला. खूनानंतर त्याचे हात, पायांचे तुकडे करुन ते एका कुपनलिकेत टाकून देत मृतदेहाची अवहेलना केल्याचे निकम यांनी यावेळी न्यायालयात सांगितले. आरोपींच्या वतीने त्यांच्या वकिलांनी एक आरोपीचे वय साठ तर अन्य आरोपी हे तरूण असल्यामुळे त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली जावी, असा बचाव केला. त्यांच्या या बचावाच्या युक्तीवाद निकम यांनी खोडून काढत गुन्हेगार हे सज्ञान असून त्यांनी पुर्णत: नियोजित कट रचून अत्यंत थंड डोक्याने क्रूरपणे तिहेरी हत्त्याकांड घडवून आणत जातीयव्यवस्थेला खतपाणी घालण्याचा प्रकार केल्याचे सांगितले. त्यामुळे न्यायालयाने समाजाला एक मोठा संदेश या खटल्याच्या निमित्ताने मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावत द्यावा, जेणेकरून यापुढे असे क्रूर व निर्दणी मानवतेला काळीमा फासणारे गुन्हे करण्याचे धाडस समाजातून कोणी करण्यास धजावणार नाही, असे निकम यांनी न्यायालयास सांगितले.

इंदिरा गांधी यांच्या हत्त्येचा दाखला-

जिल्हा न्यायालयात सुनावणी दरम्यान, विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्वल निकम यांनी देशाच्या दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्त्येचाही दाखला दिला. यावेळी ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने गांधी यांच्यावर गोळ्या झाडणा-या दोघांसह तीस-या संशयितालाही दोषी धरले. घटनास्थळी तीसरा संशयित उपस्थित नव्हता; मात्र गांधी यांच्या हत्त्येचा कट शिजविण्यात त्याचाही सहभाग असल्याचे सिध्द झाल्यामुळे तो देखील तेवढाच वाटेकरी असल्याचे सांगत त्यालाही शिक्षा सुनावली होती. यासोबतच त्यांनी बच्चनसिंग खटला, टी.मच्छिसिंग खटल्याचेही संदर्भ दिले.

नेमकी काय आहे घटना?
या हत्याकांड प्रकरणाबाबत अधिक माहिती अशी की, नेवासा फाटा येथील घाडगे-पाटील महाविद्यालयाच्या त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलात असलेल्या बी.एड महाविद्यालयातील एका मुलीचे सफाई कामगार म्हणून तात्पुरत्या स्वरूपात कामास असलेल्या मेहतर समाजातील सचिन घारू या मुलावर प्रेम होते. या प्रेम प्रकरणातून १ जानेवारी २०१३ रोजी सोनईजवळील गणेशवाडी शिवारातील विठ्ठलवाडी येथे सचिन घारू (२३), संदीप राज धनवार (२४) व राहुल कंडारे (२६) या तिघा तरुणांची अमानुषपणे हत्या करण्यात आली होती. हे तिघेही नेवासे फाटा येथील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानमध्ये कामास होते. त्यांना स्वच्छतागृहाची टाकी साफ करायची आहे, असे सांगून विठ्ठलवाडी येथे बोलावून घेण्यात आले. त्यानंतर धनवार व कंडारे यांचा खून करून त्यांचे मृतदेह पोपट दरंदले यांच्या कोरड्या विहिरीत पुरण्यात आले, तर घारू याचे मुंडके व हातपाय जनावरांचा चारा तोडण्याच्या अडकित्त्याने तोडून कूपनलिकेत टाकून देण्यात आले होते.

या प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात सातही आरोपींविरोधात खून, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, भारतीय हत्यार कायदा तसेच मुंबई पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. नेवासा सत्र न्यायालयात खटला सुरू असताना साक्षी पुराव्याच्या वेळी साक्षीदारांवर दबाव येऊ शकतो या शक्यतेमुळे तो नाशिक किंवा जळगाव न्यायालयात चालवावा, अशी विनंती याचिका मृताचे नातलग पंकज राजू तनवार यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती. सुनावणीअंती खंडपीठाने याचिकाकर्त्यांचे मुद्दे, म्हणणे ग्राह्ण धरून त्यांची विनंती मान्य केली व हा खटला नेवासा सत्र न्यायालयातून वर्ग करून नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयात चालविण्याचे आदेश दिले होते.
 
१ जानेवारी २०१३ रोजी अहमदनगर जिल्ह्णाच्या सोनईमध्ये ही ऑनर किलिंगची घटना घडली होती़ आंतरजातीय प्रेम प्रकरणातून मुलीचे वडील, काका यांनी सचिन घारूसह त्याच्या दोन मित्रांना बोलावून घेत त्यांची निर्घृण हत्या केली़ या घटनेत प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसला तरी परिस्थितीजन्य जे पुरावे होते त्यांची साखळी आम्ही न्यायालयात उभी केली़ यामधील सातपैकी सहा आरोपींना न्यायालयाने दोषी ठरविले तर सातवा आरोपी कटामध्ये सामील नसल्याचे पुराव्यावरून समोर आले व न्यायालयाने त्याची मुक्तता केली़ तसेच शिक्षेबाबतचा अंतिम युक्तिवाद हा १८ जानेवारीला ठेवण्यात आला आहे - - अ‍ॅड. उज्ज्वल निकम, विशेष सरकारी वकील

'कठोर शिक्षा द्या'
वृद्धावस्थेतील एकुलता एक सहारा असलेल्या माझ्या सचिनचा अत्यंत निर्दयपणे खून केला़ या सर्वांना न्यायालयाने फाशीचीच शिक्षा द्यावी़ या उतारवयात मला माझ्या मुलीकडे दिवस काढावे लागत आहेत़ मुलगा असता तर माझ्यावर ही वेळ आली नसती - कलाबाई घारू (मयत सचिन घारूची आई) 

'फाशीची शिक्षा द्या'
माझ्या भावाचा निर्दयपणे खून करणा-यांना न्यायालयाने फाशीची शिक्षा द्यावी जेणेकरून भावाच्या आत्म्याला शांती मिळेल़ या घटनेनंतर घरी आलेल्या मंत्र्यांनी आर्थिक मदत तसेच नोकरीचे आश्वासन दिले, मात्र चार वर्षे होऊनही आश्वासनाची पूर्तता झालेली नाही़
- सागर कंडारे (मयत राहुल कंडारेचा भाऊ) 
 
 

 

Web Title: sonai murder case nashik court to pronounce the quantum of sentence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.