पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर ओरबाडली सोनसाखळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 04:00 PM2018-11-22T16:00:37+5:302018-11-22T16:03:04+5:30
पोलिसांची घेराबंदी, नाकाबंदी अपयशी ठरत असून सोनसाखळीचोर मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत आहे. मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या सोनसाखळीचोरीच्या घटनेमुळे हे स्पष्ट झाले आहे.
नाशिक : शहरात सोनसाखळी चोरीच्या घटना सातत्याने घडत असून या घटना रोखण्यास पोलिसांना अपयश येत आहे. पोलिसांची घेराबंदी, नाकाबंदी अपयशी ठरत असून सोनसाखळीचोर मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत आहे. मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या सोनसाखळीचोरीच्या घटनेमुळे हे स्पष्ट झाले आहे. अशोकामार्ग पुन्हा एकदा या घटनेमुळे चर्चेत आला आहे.
अशोका मार्गावरील उद्यानापासून सिध्देश अपार्टमेंटकडे जाणाऱ्या रस्त्यावर अज्ञात चोरट्याने पल्सर दुचाकीवरुन भरधाव येत जोत्सना शिवाजी वाघ (४८,रा. मातोश्री कॉलनी, खोडेनगर) यांची सोनसाखळी अशोका शाळेच्या पुढे ओरबाडली. सुमारे २३ हजार रुपये किंमतीची ११.७६०ग्रॅम वजनाची सोनसाखळी चोरट्याने हिसकावून पळ काढला. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी घटना घडली तेथून अशोका मार्ग पोलीस चौकी अवघ्या हाकेच्या अंतरावर आहे. बुधवारी (दि.२२) संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास ही घटना घडली. वाघ या पायी घराकडे येत असताना चोरट्याने डाव साधला. मागील तीन ते चार दिवसांपासून अशोका मार्गावर दोन ठिकाणी पोलिसांची नाकाबंदी सुरू आहे. तरीदेखील गुन्हेगारीच्या घटना घडत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सोनसाखळी चोरी, मोबाईल चोरी, पर्सचोरीच्या घटनांनी या भागातील रहिवाशी जेरीस आले आहे. चोरट्यांचा उपद्रव कमी पडतो की काय त्यात अजून टवाळखोर रोडरोमियोंची भर पडत असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. पोलिसांचे गस्ती वाहन पुढे अन् चोरटे मागे अशी अवस्था या मार्गावर असते. पोलीस वाहन पुढे गेले की मागे गुन्हेगारीच्या घटना घडतात. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरिक्षक एस.जी.सोनोने करीत आहेत.