सोनसाखळी चोरटे ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 01:11 AM2019-05-21T01:11:03+5:302019-05-21T01:11:20+5:30
शहर व परिसरात सोनसाखळी हिसकावून पळ काढण्याच्या घटना सुरू असताना मुंबईनाका गुन्हे शोध पथकाला अट्टल सोनसाखळी, मोबाइल हिसकावणाऱ्या चोरांच्या मुसक्या आवळण्यास यश आले आहे.
नाशिक : शहर व परिसरात सोनसाखळी हिसकावून पळ काढण्याच्या घटना सुरू असताना मुंबईनाका गुन्हे शोध पथकाला अट्टल सोनसाखळी, मोबाइल हिसकावणाऱ्या चोरांच्या मुसक्या आवळण्यास यश आले आहे. चोरट्यांकडून एकूण आठ लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
महिनाभरापासून शहरात सोनसाखळी चोरीसारख्या जबरी लुटीच्या घटना वाढल्या होत्या. मुंबईनाका पोलीस ठाणे हद्दीत वडाळारोडवर नासर्डीपुलालगत एका पादचाºयाला चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना बुधवारी (दि.१५) घडली होती. या घटनेत फिर्यादीने मुंबईनाका पोलिसांकडे तक्रार दिली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी याप्रकरणी गुन्हे शोध पथकाला तातडीने फिर्यादीने संशयितांचे वर्णन सांगितले. त्यानुसार रात्रगस्तीवर असलेले गुन्हे शोध
पथकाचे हवालदार मधुकर घुगे, दीपक वाघ, भाऊसाहेब नागरे यांनी मुंबईनाका, शिवाजीवाडी, गोविंदनगर या भागात संशयितांचा शोध सुरू केला. यावेळी एक अल्पवयीन संशयित घुगे यांच्या हाती लागला. पोलिसांना त्याच्यावर संशय बळावल्याने त्यास पोलीस ठाण्यात आणून कसून चौकशी केली असता त्याने सराईत गुन्हेगार योगेश दामू कडाळे (२१), कैलास हरी भांगरे (१८), अंकुश सुरेश निकाळजे (१९) या तिघांची नावे सांगितली.
यांच्या मदतीने परिसरात लूटमारीचे गुन्हे करत असल्याचा सुगावा पोलिसांना लागला. अल्पवयीन गुन्हेगारावरही यापूर्वी घरफोडीचा गुन्हा दाखल असल्याचे तपासात पुढे आले आहे. तसेच योगेश हा सराईत गुन्हेगार असून सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीत त्याच्यावर सोनसाखळी चोरीसारखे नऊ गुन्हे दाखल आहेत. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत योगेश हा अल्पवयीन मुलांच्या मदतीने गुन्हे करत होता. चेहरा झाकलेला व दुचाकीचा क्रमांक अस्पष्ट असल्याने फिर्यादी महिलांना त्याचे वर्णन सांगणे अवघड होत होते; त्यामुळे योगेश पोलिसांना चकवा देत गुन्हेगारी करत होता. त्याची ‘खाकी’च्या शैलीत चौकशी केली असता तब्बल १८ गुन्हे उघडकीस आले असून, सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये लंपास केलेल्या मुद्देमालापैकी ८ लाख ९२ हजारांचा मुद्देमाल धारधार चाकू जप्त केल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.