सोनपावलांनी आज गौरींचे आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 01:13 AM2018-09-15T01:13:13+5:302018-09-15T01:13:19+5:30
नाशिक : गणरायापाठोपाठ शनिवारी (दि. १५) सोनपावलांनी महालक्ष्मींचे आगमन होत आहे. गणेशाची माता पार्वती-म्हणजेच गौरी हिचेही स्वागत तितक्याच मंगलमय वातावरणात, उत्साहाने करण्यास नाशिककर सज्ज झाले आहे. घरोघरी रात्री उशिरापर्यंत गौरींच्या देखाव्याची सजावट, फराळाचे पदार्थ करण्यात महिला मग्न असल्याचे दिसून आले.पश्चिम महाराष्ट्रात गौरी-गणपती, तर मराठवाड्यात महालक्ष्मी असे म्हटले जाते. महालक्ष्मींचा हा सण तीन दिवस घरोघरी साजरा होणार आहे.
पहिल्या दिवशी आगमन, दुसऱ्या दिवशी गौरीपूजन व तिसºया दिवशी म्हणजेच भाद्रपद शुक्ल अष्टमीला या गौरी-महालक्ष्मींचे विसर्जन होईल. काहींच्या घरी फोटोतल्या, मुखवट्याच्या, उभ्या, सुगडाच्या, खड्याच्या तर काहींच्या घरी मातीच्या मुखवट्याच्या महालक्ष्मी असतात. प्रथेप्रमाणे त्यांची स्थापना, पूजन व विसर्जन केले जाते.
गौरींच्या सजावटीसाठी बाजारात वैविध्यपूर्ण साहित्य दाखल झाले असून, रात्री उशिरापर्यंत महिलांनी दागिने, साड्या, सजावटीचे साहित्य, फराळाचे पदार्थ, पूजेचे साहित्य, फळे, फुले आदींच्या खरेदीवर भर दिला. गौरींच्या पूजनासाठी सोळ्या भाज्यांचा नैवेद्यही दाखविला जात असल्याने बाजारात या भाज्या विक्रीस ठेवण्यात आल्या आहेत. तीन दिवस अगदी आनंदाचे, उत्साहाचे वातावरण असताना तिसºया दिवशी गौरींचे विसर्जन होणार असल्यामुळे मात्र काहीशी दु:खाची छाया असणार आहे.