सोनगावच्या जवानाचा नदीत पडून मृत्यू
By admin | Published: May 18, 2017 12:30 AM2017-05-18T00:30:35+5:302017-05-18T00:30:56+5:30
आज अंत्यसंस्कार : वाचविण्यासाठी सहकाऱ्यांचे प्रयत्न अयशस्वी
लोकमत न्यूज नेटवर्क
सायखेडा : उत्तराखंड येथे सहकाऱ्यांसोबत कर्तव्य बजावत असताना कोसी नदीत पाय घसरून पडल्याने सोनगाव (ता. निफाड) येथील जवान मयूर संताराम पंडित (२६) याचा अंत झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. मृत जवानावर सोनगाव येथे गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मयूर पंडित सैन्य दलाच्या ७७ राष्ट्रीय छात्र बटालियनमध्ये कार्यरत होता. मंगळवारी उत्तराखंड राज्यातील चौसालीजवळ कॅम्पसाठी तो सहकाऱ्यासह जागेचा शोध घेत होता. यावेळी पाय घसरून तो कोसी नदीत पडला. त्याला वाचविण्याचा सहकाऱ्यांनी आटोकाट प्रयत्न केला. मात्र त्यांना अपयश आले.
स्थानिक पोलीस आणि सैन्य दलातील सैनिकांच्या काही तासांच्या शोधमोहिमेनंतर मयूरला पाण्याबाहेर काढण्यात यश आले. मात्र तत्पुर्वी त्याचा मृत्यू झाला होता. घटनेच्या दिवशी सकाळी मयुर याने कुटूंबीयांशी भ्रमणध्वनीद्वारे संवाद साधला होता. त्याचा मोठा भाउ निलेश याला सैन्य दलातून या घटनेची माहिती देण्यात आली. गुरूवारी त्याचे पार्थिव सोनगावी आणण्यात येणार आहे. त्यानंतर त्याच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. मयुरच्या निधनामुळे सोनगावात शोककळा पसरली. त्याचा लहान भाऊ रविंद्र हा देखील भारतीय सैन्यदलात (गुजरात) येथे कार्यरत आहे. घटनेचे वृत्त कळताच तोही गावी परतला आहे. दोन वर्षापूर्वीच मयुर याचा विवाह झाला होता. त्याच्या पश्चात पत्नी पुजा, अकरा महिन्याचा मुलगा वंश, वडील संताराम, आई अरु णा, भाऊ निलेश व रविंद्र असा परिवार आहे.
अपघाती मृत्यू झालेला मयूर भारतीय सैन्य दलात सन २०१० साली दाखल झाला होता. सात वर्षाच्या कार्यकाळात मध्य प्रदेश येथील केंद्रावर प्रशिक्षण घेतल्यानंतर त्याने अरुणाचल प्रदेश, पठाणकोट, बारामुल्ला, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड येथे सेवा बजावली. पंधरा दिवसांपूर्वी कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर सुटी संपल्याने तो पुन्हा कर्तव्यावर कार्यरत होण्यासाठी उत्तराखंड येथे रवाना झाला होता.