सोनई हत्याकांडाचा निकाल १५ जानेवारीला, प्रेमप्रकरणातून हत्या; ५३ साक्षीदार तपासले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 04:31 AM2018-01-02T04:31:34+5:302018-01-02T04:31:45+5:30
अहमदनगर जिल्ह्यातील सोनई येथे २०१३ मध्ये घडलेल्या बहुचर्चित तिहेरी हत्याकांड खटल्यात सोमवारी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयात सुमारे अर्धा तास आरोपींच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादाला उत्तर दिले़
नाशिक - अहमदनगर जिल्ह्यातील सोनई येथे २०१३ मध्ये घडलेल्या बहुचर्चित तिहेरी हत्याकांड खटल्यात सोमवारी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयात सुमारे अर्धा तास आरोपींच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादाला उत्तर दिले़ या खटल्यात ५३ साक्षीदार तपासण्यात आले असून, १५ जानेवारीला जिल्हा व सत्र न्यायाधीश आऱ आऱ वैष्णव या खटल्याचा निकाल देण्याची शक्यता आहे़
प्रेमप्रकरणातून जानेवारी २०१३मध्ये सोनईजवळील गणेशवाडी शिवारातील विठ्ठलवाडी येथे संदीप राज धनवार (२४), राहुल कंडारे (२६), सचिन घारू (२३) या तरुणांची अमानुषपणे हत्या करण्यात आली.
या हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी संशयित प्रकाश विश्वनाथ दरंदले, रमेश विश्वनाथ दरंदले, पोपट विश्वनाथ दरंदले, गणेश पोपट दरंदले, अशोक रोहिदास फलके, अशोक नवगिरे, संदीप कु-हे यांना पोलिसांनी अटक केली आहे़ नेवासा सत्र न्यायालयात खटला सुरू असताना साक्षी पुराव्याच्या वेळी साक्षीदारांवर दबाव येऊ शकतो, या शक्यतेमुळे तो नाशिक किंवा जळगाव न्यायालयात चालवावा, अशी विनंती याचिका मृताचे नातलग पंकज राजू तनवार यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती. सुनावणीअंती खंडपीठाने याचिकाकत्यार्चे मुद्दे, म्हणणे ग्राह्य धरून त्यांची विनंती मान्य केली व हा खटला नेवासा सत्र न्यायालयातून वर्ग करून नाशिक सत्र न्यायालयात चालविण्याचे आदेश दिले होते.