सोनई हत्याकांडातील कैद्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 01:00 AM2018-06-24T01:00:51+5:302018-06-24T01:01:18+5:30
राज्यभर गाजलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील सोनाई येथील तिहेरी हत्याकांडात फाशीची शिक्षा सुनावलेल्या कैदी पोपट ऊर्फ रघुनाथ विश्वनाथ दरंदले याचा शनिवारी सकाळी जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
नाशिकरोड : राज्यभर गाजलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील सोनाई येथील तिहेरी हत्याकांडात फाशीची शिक्षा सुनावलेल्या कैदी पोपट ऊर्फ रघुनाथ विश्वनाथ दरंदले याचा शनिवारी सकाळी जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अहमदनगर जिल्ह्यातील सोनई येथे २०१३ मध्ये झालेल्या तिहेरी हत्याकांडाने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. याप्रकरणी संशयित पोपट ऊर्फ रघुनाथ विश्वनाथ दरंदले याला ५ जानेवारी २०१३ साली अटक झाली होती. त्यानंतर नाशिकच्या सत्र न्यायालयाने २० जानेवारी २०१८ रोजी फाशीची शिक्षा ठोठावली होती. गेल्या जानेवारी महिन्यापासून नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात फाशीची शिक्षा सुनावलेला पोपट दरंदले शिक्षा भोगत होता. गेल्या काही दिवसांपासून तो आजारी होता. चार दिवसांपूर्वी त्याला हृदयविकारचा त्रास जाणवू लागल्याने जिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. दरंदलेवर उपचार सुरू असताना शनिवारी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाल्याचे कारागृह अधीक्षक राजकुमार साळी यांनी सांगितले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.