सोनई हत्याकांडातील सहा खुन्यांना फाशी; आरोपी तर सैतानच आहेत, न्यायालयाची टिप्पणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 06:06 AM2018-01-21T06:06:38+5:302018-01-21T06:06:54+5:30
संपूर्ण राज्याला हादरविणारे अहमदनगर जिल्ह्यातील सोनई येथील तिहेरी हत्याकांडातील ६ दोषींना शनिवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. आर. वैष्णव यांनी फाशीची शिक्षा सुनावली. यात तीन सख्ख्या भावांचा समावेश आहे. ‘तुमचे कृत्य माणुसकीला काळिमा फासणारे तर आहेच, परंतु तुम्ही ज्या निर्दयतेने हे हत्याकांड घडविले, ते पाहता तुम्ही सैतानही आहात.
नाशिक : संपूर्ण राज्याला हादरविणारे अहमदनगर जिल्ह्यातील सोनई येथील तिहेरी हत्याकांडातील ६ दोषींना शनिवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. आर. वैष्णव यांनी फाशीची शिक्षा सुनावली. यात तीन सख्ख्या भावांचा समावेश आहे. ‘तुमचे कृत्य माणुसकीला काळिमा फासणारे तर आहेच, परंतु तुम्ही ज्या निर्दयतेने हे हत्याकांड घडविले, ते पाहता तुम्ही सैतानही आहात. तुम्ही जिवंत राहणे समाजासाठी धोकादायक आहे,’ अशा शब्दांत न्यायाधीश वैष्णव यांनी निकालपत्रात टिप्पणी केली.
रमेश विश्वनाथ दरंदले (३९), प्रकाश विश्वनाथ दरंदले (३४), पोपट उर्फ रघुनाथ विश्वनाथ दरंदले (४८), गणेश उर्फ प्रवीण पोपट दरंदले (१९, ) अशोक सुधाकर नवगिरे (२८) व संदीप माधव कु-हे (३३) यांना सोमवारी न्यायालयाने दोषी ठरविले होते. सवर्ण समाजाच्या मुलीशी प्रेम असल्याच्या संशयावरून आरोपींनी सचिन सोहनलाल घारू (२६), संदीप राजू थनवार (२४) व राहुल राजू कंडारे (२६, सर्व रा. त्रिमूर्ती कॉलेज, नेवासा फाटा) यांचा निर्दयपणे १ जानेवारी २०१३ रोजी खून केला होता.
राज्य गुन्हा अन्वेषण विभागाने घटनेचा तपास केला. विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांनी काम पाहिले. न्यायालयाने सहाही आरोपींना शिक्षेविरुद्ध उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी ३० दिवसांची मुदत दिली आहे.
पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न
मारेक-यांनी सचिनचे दोन्ही हात व पायाचे तुकडे शेतातील उघड्या बोअरवेलमध्ये टाकून पुरावा नष्ट केला. त्याच्या शरीराचे इतर अवयव व राहुल कंडारे याचा मृतदेह विहिरीत पुरला. रक्ताने माखलेले कपडे शेतात जाळून टाकले. संदीप थनवारचा सेफ्टी टॅँकमध्ये गुदमरून मृत्यू झाल्याची माहिती सोनई पोलिसांना दिली.
- दोषींना प्रत्येकी १० हजार रुपये दंडाचीही शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेतून मृताच्या वारसांना प्रत्येकी २० हजार
रुपये देण्यात यावेत, असे न्यायालयाने सांगितले.
क्रौर्याची परिसीमा
सुदृढ बांध्याचा संदीप राजू थनवार यास ६ जणांनी तो काम करत असलेल्या सेफ्टी टॅँकमध्येच बुडवून मारले. ते पाहून पळालेल्या राहुल उर्फ तिलक राजू कंडारे याचा पाठलाग करून मारेकºयांनी ऊसतोडीच्या कोयत्याने वार करत ठार मारले. सचिन धारू याच्याविषयी मारेकºयांच्या मनात अधिक राग होता. त्यांनी सचिनला शेतातील खड्ड्यात नेऊन वैरण कापण्याच्या अडकित्त्याने मारले. त्यांनी त्याचे दोन्ही पाय व हात कापले. त्यानंतर, जिवंतपणी त्याची मान कापून क्रूरपणे त्यास ठार मारले.
पीडितांना सरकारी मदत नाहीच
मृतांच्या नातेवाइकांना सरकारी नोकरी, तसेच आर्थिक मदतीचे आश्वासन देण्यात आले होते़ मात्र, सचिन घारू, राहुल कंडारे व संदीप थनवार यांच्या नातेवाइकांनी सरकारडून कोणतीही मदत मिळाली नसल्याचे सांगितले़.
जातीयवाद ही समाजाला लागलेली एचआयव्हीसारखी कीड आहे़ तुमच्यासारखी हिंस्त्र मनोवृत्तीची माणसे जिवंत राहणे समाजास धोकादायक आहे. त्यामुळे तुम्हाला देहदंड ही शिक्षाच योग्य आहे.
- आऱ आऱ वैष्णव, जिल्हा सत्र न्यायाधीश