जामीनावर असलेल्या सोनिया, राहुल यांना मोदींविषयी बोलण्याचा अधिकार नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 09:31 PM2018-06-12T21:31:27+5:302018-06-12T21:31:27+5:30
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी व काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे जामिनावर सुटलेले लोक आहेत. त्यांना पंतप्रधानांविषयी बोलण्याचा अधिकारच नाही, असे वक्तव्य संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी मंगळवारी (दि.१२) नाशिक येथे केले.
नाशिक : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी व काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे जामिनावर सुटलेले लोक आहेत. त्यांना पंतप्रधानांविषयी बोलण्याचा अधिकारच नाही, असे वक्तव्य संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी मंगळवारी (दि.१२) नाशिक येथे केले.
राहुल गांधी यांच्यावर आरएसएसच्या बदनामी केलाचा आरोप असून, या प्रकरणात भिवंडी येथील न्यायालयात ते हजर झाले असल्याविषयी डॉ. भामरे यांना विचारले असता राहुल गांधी आणि सोनिया गांधी नॅशनल हॅरॉल्ड प्रकरणात जामिनावर असून, त्यांना आरएसएस आणि मोदींविषयी बोलण्याचा काहीही अधिकार नसल्याचे विधान केले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिवाला धोका असल्याचे पत्र संशयास्पद असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनाच्या समारोप कार्यक्रमात केला होता. त्यानंतर देशभरात पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांच्या जिवाला धोका असल्याच्या पत्राविषयी संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. याविषयी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान असून, त्यांच्या जिवाला धोका असल्याचे यापूर्वीही अनेकदा स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सध्या जी चर्चा सुरू आहे, ती राजकीय असून अशी चर्चा योग्य नसल्याचे सांगतानाच पंतप्रधानांना धोका असल्याचे इनपूट पोलिसांचे नव्हे, तर इंटेलिजन्स विभागाचे आहे. ही सर्वच माहिती शेअर करता येत नाही. त्यामुळे विरोधक जे बोलतात ते गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचेही भामरे म्हणाले.