दोन रुग्णालयांत होणार सोनोग्राफीची सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 12:46 AM2018-12-29T00:46:19+5:302018-12-29T00:46:44+5:30
महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या वाढत असताना विशेषत: प्रसूतीसाठी महिला येत असताना अवघ्या दोनच रुग्णालयांमध्ये सोनोग्राफी मशीन आहेत.
नाशिक : महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या वाढत असताना विशेषत: प्रसूतीसाठी महिला येत असताना अवघ्या दोनच रुग्णालयांमध्ये सोनोग्राफी मशीन आहेत. त्यामुळे आणखी दोन मशीन घेऊन ते मोरवाडी आणि डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रशासनाच्या वतीने आरोग्य समितीच्या बैठकीत याबाबत माहिती देण्यात आली. महापालिकेच्या आरोग्य समितीची बैठक सभापती सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. २८) पार पडली. यावेळी याबाबत वैद्यकीय अधीक्षक डॉ. राहुल गायकवाड आणि डॉ. राजेंद्र भंडार यांनी ही माहिती दिली.
सिडकोतील मोरवाडी येथील श्री स्वामी समर्थ रुग्णालयात गेलेल्या एका गर्भवती महिलेला सोनोग्राफीसाठी अन्यत्र पाठविल्याची तक्रार होती. त्या पार्श्वभूमीवर कुलकर्णी तसेच अन्य सदस्यांनी प्रशासनाला विचारणा केली. यावेळी महापालिकेच्या बिटको आणि पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालय येथेच सोनोग्राफीची व्यवस्था आहे. त्यामुळे अन्य रुग्णालयातील रुग्णांना शासकीय रुग्णालय किंवा बिटको रुग्णालयात पाठविण्याचा सल्ला दिला जातो.
बिटकोत एक रेडिओलॉजिस्ट आहे, तर इंदिरा गांधी रुग्णालयात आॅनकॉल डॉक्टरच हे काम बघतात. सिडकोतील महिलेलादेखील याच कारणामुळे सोनोग्राफी बाहेरून करून आणण्याचा सल्ला देण्यात आला होता. महापालिका आता आणखी दोन सोनोग्राफी मशीन घेण्यात येणार आहे. ते श्री स्वामी समर्थ रुग्णालय व डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात मशीन उपलब्ध होतील, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, महापालिकेच्या सफाई कामगारांतील काही कामगारांच्या व्यसनाधिनतेच्या पार्श्वभूमीवर या कामगारांसाठी व्यसनमुक्ती शिबिर आयोजित करण्याचा प्रस्ताव सभापती सतीश कुलकर्णी यांनी मांडला होता. तोदेखील मंजूर करण्यात आला. महापालिकेच्या बिटको रुग्णालयात लवकरच मानसोपचार तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात येणार आहे, त्या माध्यमातून शिबिर चालविण्यात येईल असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राहुल गायकवाड यांनी सांगितले.
स्वच्छतेच्या अहवालाबाबत विचारला जाब
महापलिकेच्या सर्व विभागीय अधिकाऱ्यांना दर आठवड्याला केलेला कारवाईचा अहवाल आरोग्य समितीला सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र दोन ते तीन विभागीय कार्यालयाकडूनच अहवाल प्राप्त असून, त्यावरदेखील सभापतींनी नाराजी व्यक्त केली.