गर्भवती महिलांसाठी सोनोग्राफीची खासगी केंद्रात सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 01:08 AM2019-06-18T01:08:34+5:302019-06-18T01:08:56+5:30
केंद्र शासनाच्या राष्टÑीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत लाभपात्र गर्भवती महिलांसाठी महापालिकेच्या सर्वच रुग्णालयांमध्ये सोनोग्राफीची सुविधा नसल्याने खासगी सेंटरमध्ये असलेली सुविधा वापरून त्याबदल्यात संबंधित सेंटर चालविणाऱ्यांना प्रतिपूर्ती करण्यात येणार आहे.
नाशिक : केंद्र शासनाच्या राष्टÑीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत लाभपात्र गर्भवती महिलांसाठी महापालिकेच्या सर्वच रुग्णालयांमध्ये सोनोग्राफीची सुविधा नसल्याने खासगी सेंटरमध्ये असलेली सुविधा वापरून त्याबदल्यात संबंधित सेंटर चालविणाऱ्यांना प्रतिपूर्ती करण्यात येणार आहे.
केंद्र शासनाच्या वतीने शहरी भागात राष्टÑीय आरोग्य अभियान राबवले जाते. त्या अंतर्गत गर्भवती महिलांसाठी विविध योजना आहेत. महापालिकेची रुग्णालये आणि प्रसूतिगृहात ज्या सुविधा नाहीत, त्या खासगी व्यावसायिकांमार्फत उपलब्ध करण्याची तरतूददेखील आहेत. महापालिकेच्या नाशिकरोड येथील बिटको आणि पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयात सोनोग्राफी केंद्रांची सुविधा उपलब्ध आहे, परंतु अन्य ठिकाणी अशी सुविधा नाही. ज्या ठिकाणी प्रसूतीसाठी महिला जातात त्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय व सिडकोतील श्री स्वामी समर्थ रुग्णालय मोरवाडी येथे सोनोग्राफी मशीन मंजूर असून, सध्या ती निविदा कार्यवाहीत आहेत. लवकरच ही सुविधादेखील त्या रुग्णालय व प्रसूतिगृहात उपलब्ध होईल. तथापि, अनेक ठिकाणी अशी सुविधा नसल्याने महापालिकेने खासगी सोनोग्राफी सेंटरची मदत घेतली आहे. त्यासाठी प्रति सोनोग्राफी चारशे रुपयांचा प्रतिपूर्ती खर्च देण्याचीदेखील तयारी आहे. गेल्यावर्षी मनपाने केलेल्या आवाहनाला १५ केंद्रांनी प्रतिसाद दिला होता. पैकी १३ केंद्रांनी नियमित सेवा दिली. आता महापालिकेने आवाहन केल्यानंतर आणखी पाच केंद्रांनी तयारी दर्शविली आहे.
अशाच प्रकारे प्रसूतीच्या वेळी महिलांचा रक्तस्राव झाल्यानंतर त्यांना रक्तपुरवठा करण्यासाठी रक्तपेढ्यांची मदत घेऊन त्यांना तीनशे रुपये प्रति रक्तपिशवी देण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी महापालिकेने रक्तपेढ्यांचा शोध सुरू केला आहे.
बिटको रुग्णालयात सीटीस्कॅन
महापालिकेच्या बिटको रुग्णालयात एमआरआय मशीन व सीटीस्कॅन मशीन खरेदी करण्यासाठी १९ कोटी रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव येत्या गुरुवारी (दि.२०) होणाºया महासभेत मांडण्यात आला आहे. अर्थात, कुंभमेळ्यापासून हा प्रस्ताव असून वेगवेगळ्या पातळ्यांवर तो अडकत असल्याने आता तरी हा विषय मार्गी लागणार काय याविषयी शंका आहे.