‘सोनू’ला परिचारिकांमुळे जीवदान!
By admin | Published: April 6, 2017 02:15 AM2017-04-06T02:15:56+5:302017-04-06T02:16:26+5:30
नाशिक : मानसिक संतुलन बिघडलेली तसेच रेल्वेस्टेशन, बसस्थानक वा पडीक जागेत वास्तव्य करणाऱ्या एका कुमारी मातेचे महिनाभरापूर्वी जिल्हा रुग्णालयात सिझर करण्यात आले़
नाशिक : मानसिक संतुलन बिघडलेली तसेच रेल्वेस्टेशन, बसस्थानक वा पडीक जागेत वास्तव्य करणाऱ्या एका कुमारी मातेचे महिनाभरापूर्वी जिल्हा रुग्णालयात सिझर करण्यात आले़ डॉक्टरांनी सिझरद्वारे आई व मुलगा या दोघांचेही प्राण वाचविले़; मात्र जन्मत:च बाळाचे वजन कमी व श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यास एसएनसीयू युनिटमध्ये दाखल केल़े यानंतर अवघ्या तीन दिवसांत मुलास सोडून जन्मदात्री निघून गेली़ यानंतर तब्बल महिनाभराहून अधिक काळ आईप्रमाणे काळजी घेतलेल्या मुलास (सोनू) बुधवारी (दि़ ५) आधाराश्रमाकडे सुपूर्द करण्यात आले़ याप्रसंगी एकीकडे सोनू इथून जाणार हे दु:ख तर दुसरीकडे त्यास जीवदान दिल्याचे समाधान असे दुहेरी भाव या युनिटमधील परिचारिकांच्या चेहऱ्यावर होते़
शनिवार, दि. ४ मार्च रोजी एका कुमारी गर्भवतीला बाळंतपणासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ विशेष म्हणजे या कुमारीकेचे मानसिक संतुलन बिघडलेले असल्याने तिचे वास्तव्य कधी रेल्वेस्थानक, बसस्थानक तर कधी मोकळ्या जागेवऱ त्यामुळे या मुलाचा जन्मदाता शोधणेही कठीणच़ या कुमारीकेची नॉर्मल डिलिव्हरी शक्य नसल्याचे लक्षात येताच डॉक्टरांनी सिझरचा निर्णय घेतला व तिला मुलगा झाला़ मात्र, जन्मत: या मुलाचे वजन कमी अन् श्वास घेण्यासाठीही त्रास होत असल्याने त्यास जिल्हा रुग्णालयातील स्पेशल न्यूबॉर्न केअर युनिटमध्ये दाखल करण्यात आले़
एसएनसीयू युनिटमध्ये दाखल केलेल्या या नवजात मुलाची आई तीन दिवसांतच त्यास सोडून कुठेतरी निघून गेली़ केवळ कमी वजन असलेल्या या मुलास (सोनू) सुरुवातीला आॅक्सिजनवर ठेवण्यात आले होते़ त्यातच मुलाची आईच निघून गेल्याने आईचे दूधही नव्हते़ अशा विचित्र परिस्थितीत मुलाला जगविण्याचे-जीवदान देण्याचे मोठे आव्हान या युनिटपुढे होते़ या युनिटमधील पेडियाट्रिक इनचार्जसह सर्व स्टाफ नर्सेसने या मुलास जीवदान द्यायचेच असा निश्चय करून नियमितपणे तब्बल ३२ दिवस स्पंजिंग, फीडिंग, सस्केनिंग करून काळजी घेतली़ यामुळे ३२ दिवसांत या मुलास जीवदान तर मिळालेच शिवाय त्याचे वजनही चांगले वाढले़
दरम्यान, जन्मदात्री परत न आल्याने या मुलास बुधवारी (दि़ ५) आधाराश्रमाकडे सुपूर्द करण्यात आले़ तब्बल ३२ दिवस आईप्रमाणे सांभाळलेला हा मुलगा परिचारिकांनी लाडाने नाव ठेवलेला सोनू पोलिसांच्या हाती देताना सर्वांनाच गहिवरून आले होते़ एकीकडे या मुलास मृत्यूच्या दाढेतून वाचविल्याचे समाधान होते तर दुसरीकडे तो जाणार याचे दु:ख होते़
एसएनसीयू विभागातील पेडियाट्रिक इनचार्ज वर्षा नामूरकर, श्रद्धा पाटील व स्टाफ नर्सेस आऱ एस़ पाटील, सीमा शेवाळे, मीना नागमोडे, सईदा शाह, प्रमिषा पाटील, मीनाक्षी घोडेस्वार, रोहिणी घुले, भावना कटाळे, भारती शिंदे, श्वेता मांडे, स्मिता कसोटे, माधुरी बनसोडे यांनी सोनूची विशेष काळजी घेऊन त्यास जीवदान दिले आहे़ (प्रतिनिधी)