सोनू तुला वीज बिल भरायचे नाय का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:16 AM2021-03-10T04:16:09+5:302021-03-10T04:16:09+5:30
नाशिक: कोरोनाच्या संकट काळापासून अडचणीत आलेल्या महावितरणपुढे वीज बिल वसुलीचे संकट आहे. वीज बिलाची वसुली आणि सूट हा ...
नाशिक: कोरोनाच्या संकट काळापासून अडचणीत आलेल्या महावितरणपुढे वीज बिल वसुलीचे संकट आहे. वीज बिलाची वसुली आणि सूट हा मुद्दा आता राजकीय इच्छाशक्तीचा झाल्याने महावितरणपुढेही अडचणी निर्माण झालेल्या आहेत. असे असले तरी प्रत्येक परिमंडळाने आपल्या ग्राहकांनी वीज बिल भरावे यासाठीचे प्रयत्न चालविले आहेत. त्यातच नाशिक परिमडळाने ग्राहकांना वीज बिल भरण्याचे आवाहन केले आहे. गीताच्या माध्यमातून त्यांनी ग्राहकांना घातलेली साद लक्ष वेधून घेत आहे.
सोनू आहे राजाची शान; सोनूला गावात मान!
सोनूचा मोबाईल भारी, सोनूची गाडी लय भारी...
सोनू आमचा ग्राहक लाडका,
आम्ही त्याला वीज देतो बरका,
सोनूची कॉलर टाईट, बिल भरायले वाटते वाईट,
साेनू तुला वीज बिल भरायचे नाही का?
‘सोनू तुला माझ्यावर भरवसा नाय काय?’
या धम्माल गीताच्या चालीवर महावितरणने हे गीत तयार केले आहे. नाशिक परिमंडळात घरगुती आणि वाणिज्यिक तसेच कृषी पंप धारकांकडे कोट्यवधींची थकबाकी आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील ग्राहकांना वीज बिल भरण्याला प्रवृत्त करण्यासाठी गीताचा आधार घेण्यात आला आहे.
नाशिक मंडलाचे अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली यांची ही संकल्पना असून उपकार्यकारी अभियंता रशमी काळोखे यांनी गीत लेखन केले आहे. त्यांनी स्वत:च हे गीत गायिले असून, त्यांना दीपश्री सरोदे, भाऊसाहेब गडाख, उपकार्यकारी अभियंता सायली क्षत्रीय, सहायक अभियंता धनश्री चौधरी, नीलेश वाणी, कल्याणी बोडके, समीर वडजे यांनी साथ दिली आहे.
या गीताचे वैशिष्ये म्हणजे सकाळी उठल्यापासून ते रात्री पर्यंत आपणाला पदोपदी विजेची गरज कशी लागते आणि वीज नसली तर काती अडचणींचा सामना करावा लागतो हे मांडण्यात आले आहे.
--कोट -
वीज बिल वसुली करण्यासाठी दरवर्षी प्रयत्न केेले जातात. यंदा जरा अधिक प्रयत्न करावे लागत आहे. वीज बिलाबाबतचा धोरणात्मक निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतल्यानुसार कार्यवाही केली जातेच; परंतु तरीही ग्राहकांना विजेचे महत्त्व आणि वीज बिल का भरले पाहिजे याची जाणीव निर्माण करून देण्यासाठी गीताचा आधार घेतला गेला आहे. ग्राहकांनी स्वयंस्फूर्तीने यासाठी पुढे येण्यास प्रवृत्त व्हावे हा या मागचा उद्देश आहे. हेच गाणे चित्रीतही केले जात असून सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रबोधन केले जाणार आहे.
- प्रवीण दरोली, अधीक्षक अभियंता.