ब्रेक फेल होताच पुढील पोलीस वाहनावर बस जाऊन आदळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 06:25 PM2019-10-23T18:25:03+5:302019-10-23T18:26:45+5:30
महामंडळाच्या बसेसचे वारंवार ब्रेक निकामी होण्याच्या घटनांमध्ये अलिकडे वाढ झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
नाशिक : त्र्यंबकनाका येथून सीबीएसमार्गे पंचवटीमध्ये जाणाऱ्या एका शहर बसचे अचानकपणे ब्रेक बुधवारी (दि.२३) निकामी झाले. त्यामुळे बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बसने पुढील कारला जोरदार धडक दिली. या धडकेने कार त्यापुढे असलेल्या पोलिसांच्या श्वानपथकाच्या वाहनावर जाऊन आदळले. सुदैवाने या अपघातात कुठल्याहीप्रकारची जीवीतहानी झाली नाही; मात्र बससह दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. महामंडळाच्या बसेसचे वारंवार ब्रेक निकामी होण्याच्या घटनांमध्ये अलिकडे वाढ झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, पंचवटी आगाराची जुन्या शहर बसचे (एम.एच४० एन९४१५) ब्रेक निकामी झाले. त्यामुळे बसचालकाचा ताबा सुटला बस वेगात असल्यामुळे थेट रस्त्यावरील पुढे असलेल्या महिंद्र टीयूव्ही कारवर (एम.एच.१५ईएक्स ७८७९) जाऊन धडकली. धडक इतकी जोरदार होती की धक्क्याने ही कार त्यापुढे असलेल्या बॉम्ब-शोधक नाशक पथकाच्या डॉगव्हॅनवर (एम.एच१५ एबी ११६) जाऊन आदळली. या अपघातात तीनही वाहनांचे नुकसान झाले. सुदैवाने बसमध्ये प्रवाशी कमी होते. त्यामुळे कोणीही जखमी झाले नाही. या विचित्रप्रकारच्या अपघातामुळे त्र्यंबकनाका परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. सकाळच्या वेळेस कार्यालयांमध्ये पोहचणाºया नोकरदारांनी आपली वाहने थांबवून अपघातस्थळी धाव घेतल्याने गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळताच मुंबईनाका, सरकारवाडा पोलिसांसह वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. यावेळी कारचालक रवींद्र पाटील यांच्या फिर्यादीनुसार, बसचालक सुभाष रामू देवकर यांच्याविरोधात अपघाताचा गुन्हा सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार शिवाजी सातभाई हे करीत आहेत.
त्र्यंबकनाक्यावर यापुर्वी असाच अपघात
त्र्यंबकनाका येथे यापुर्वीही ठाणे बसला अशाच पध्दतीचा अपघात झाला होता. महामंडळाच्या बसेससच्या देखभालदुरूस्तीचा प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे. एकीकडे बसेसच्या फेºया महामंडळाकडून शहरात रद्द केल्या जात आहे; तर दुसरीकडे ज्या बसेस रस्त्यावर धावताहेत त्यांच्याही देखभालीबाबत कानाडोळा केला जात असल्याने नाशिक करांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
---