टीका होताच सत्ताधाऱ्यांचा नवीन वाहनांचा अट्टाहास मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 01:32 AM2019-01-30T01:32:35+5:302019-01-30T01:32:56+5:30
महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असतानाही आयुक्तांसाठी नवीन वाहनाची खरेदी केली जात असल्याचे पाहून स्वत:साठी सहा वाहने खरेदी करण्याच्या पावित्र्यात असलेल्या महापालिकेच्या कारभाºयांविरुद्ध जनमानसात टीकेची झोड उठताच नवीन वाहन खरेदीचा अट्टाहास सोडून देण्यात आला आहे.
नाशिक : महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असतानाही आयुक्तांसाठी नवीन वाहनाची खरेदी केली जात असल्याचे पाहून स्वत:साठी सहा वाहने खरेदी करण्याच्या पावित्र्यात असलेल्या महापालिकेच्या कारभाºयांविरुद्ध जनमानसात टीकेची झोड उठताच नवीन वाहन खरेदीचा अट्टाहास सोडून देण्यात आला आहे. भाजपाच्या एका गटाने या खरेदीला विरोध दर्शविल्यामुळे आता पदाधिकाºयांनीच ‘आम्हाला नवीन वाहन नको’ असे पत्र प्रशासनाला धाडल्यामुळे महापालिकेचे सव्वा कोटी रुपयांचा वाचला आहे. त्यामुळे आता फक्त महापालिका आयुक्तांसाठीच नवीन वाहन खरेदी करण्यात येणार आहे.
महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्यासाठी असलेली टोयोटा कोरोला ही जुनी झाल्यामुळे काही महिन्यांपासून नादुरुस्त असून, त्यावर येणारा देखभाल व दुरुस्ती खर्च पाहता, त्यापेक्षा नवीन वाहन घेणे सोयीचे ठरेल, असा व्यावहारिक दृष्टिकोन ठेवून प्रशासनाने स्थायी समितीवर महापालिका आयुक्तांसाठी नवीन वाहन खरेदीचा प्रस्ताव पाठविला होता. हा प्रस्ताव मंजूर झाल्याचे पाहून आपल्यालाही नवीन वाहन हवे, असा अट्टाहास एका पदाधिकाºयाने धरला व स्थायी समितीवर प्रस्ताव ठेवून दोन इनोव्हा कार खरेदीची मान्यता मिळविली. महापालिकेच्या इतर पदाधिकाºयांच्या लक्षात हा प्रकार येताच, त्यांनीही नगरसेवकांचे ठराव घेऊन उपसूचनेच्या आधारे स्वत:साठी नवीन वाहन खरेदीचा आग्रह धरल्यामुळे महापालिकेने सहा इनोव्हा कार खरेदीचा घाट घालण्यात आला. मुळात मनपाची आर्थिकस्थिती बेताची असून, तिजोरीत खडखडाट असताना मनपाच्या कारभाºयांनीच तिजोरीची चालविलेल्या लुटीवर करदात्यांनी टीका करण्यास सुरुवात केली. त्यातच महापौर, उपमहापौर यांच्यासह अन्य पदाधिकाºयांचा कालावधी पूर्ण होण्यास काही महिने शिल्लक असून, पुढच्या महिन्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी होणार आहे. त्याकाळात सर्वच पदाधिकाºयांना आपली शासकीय वाहने जमा करावी लागणार आहे ही वस्तुस्थिती भाजपाच्याच एका गटाने निदर्शनास आणून दिल्यानंतर नवीन वाहनाचा अट्टाहास धरणाºया पदाधिकाºयांनी या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर चोवीस तासांत घूमजाव केले आहे. ‘आम्हाला नवीन वाहन नकोत’, असे पत्र प्रशासनाला देऊन टीकेचे धनी होण्यास नकार दिला, तर काही पदाधिकाºयांनी आपण नवीन वाहनाची मागणीच केली नसल्याचा आश्चर्यकारक पवित्रा घेतला आहे.
महापालिकेच्या तिजोरीतील स्थितीचे भान असल्यामुळेच नवीन वाहन घेण्यासाठी आपण लेखी किंवा तोंडी मागणी केलेली नाही. शहरात अनेक नागरी प्रश्न प्रलंबित असताना अशाप्रकारे नवीन वाहन खरेदी करण्याचा बालहट्ट कोणी केला हे आपणास माहीत नाही. मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या नाशिक शहरात ‘अच्छे दिन’ नेमके कोणाला आले? असा प्रश्न यानिमित्ताने पडला असून, ठरावात उपसूचना घुसवून नवीन वाहने घेऊन ‘अच्छे दिन’ आणण्याचा प्रयत्न सत्ताधाºयांनी केला आहे. भाजपाच्या पदाधिकाºयांना नवीन वाहनाची इतकीच गरज असेल तर आपण आपले वाहन देण्यास तयार आहोत.
-अजय बोरस्ते, विरोधी पक्षनेता
आता म्हणतात नवीन वाहन नको
महापौर रंजना भानसी सध्या वापरत असलेले वाहन चार वर्षांपूर्वी माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्या काळात घेण्यात आले असून, त्यानंतर काही पदाधिकाºयांसाठी दीड वर्षांपूर्वीच नवीन वाहने खरेदी करण्यात आलेली आहेत. असे असतानाही नाशिककरांच्या कर रूपातून जमा झालेल्या महसुलातून सुमारे सव्वा कोटी रुपयांची उधळपट्टी करण्यास पदाधिकारी सरसावले होते. आता मात्र त्यांनी स्वत:हूनच ‘नवीन वाहन नको’ असे म्हटल्यामुळे ‘होऊ द्या खर्चाला’ लगाम बसला आहे.