लवकरच शहराचे संपूर्ण रूप पालटल्याचे दिसेल,
By Admin | Published: June 1, 2015 01:31 AM2015-06-01T01:31:42+5:302015-06-01T01:34:12+5:30
लवकरच शहराचे संपूर्ण रूप पालटल्याचे दिसेल,
नाशिक : सरकारने नाशिक महापालिकेला किमान आठ महिने आयुक्त उपलब्ध करून दिले नाहीत. त्याचा परिणाम सिंहस्थाच्या कामावर झालेला दिसत आहे. विकासकामांना उशिराने सुरुवात झाली. तसेच पालिकेची आर्थिकस्थिती बघता विकासकामांना वेग देणे अशक्यच असून, राज्य व केंद्राने कुंभमेळ्याचा निधी उपलब्धतेला गती द्यावी. लवकरच शहराचे संपूर्ण रूप पालटल्याचे दिसेल, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी नाशिक दौऱ्यावर पत्रकारांशी बोलताना सांगितले.कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांची राज ठाकरे यांनी पाहणी केली. या दौऱ्यात महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमितसिंह बग्गा, आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, शहर अभियंता सुनील खुने आदि सहभागी झाले होते. दरम्यान, ठाकरे यांनी गोविंदनगर-तिडके कॉलनी रस्ता, दोंदे पूल, आरोग्य विज्ञान विद्यापीठाजवळ कुंभमेळ्यासाठी तयार केलेले वाहनतळ, रामकुंड परिसर, तपोवन साधुग्राम परिसराला भेट दिली. यावेळी विविध सूचना त्यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना केल्या. शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलताना ठाकरे म्हणाले, महापालिका प्रशासनाकडून कुंभमेळ्याची तयारी उत्तमरीत्या सुरू आहे. सर्वच रस्त्यांचे रुंदीकरण-डांबरीकरणाची कामे होत आहेत. वाहतूक बेटांचे, रस्त्यांमधील दुभाजकांचे सुशोभिकरणाच्या कामाला गती देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. येत्या महिनाभरात शहराचे रूपडे बदललेले दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.