नवजात शिशु दगावताच मातेने सोडले वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 12:57 AM2019-12-29T00:57:23+5:302019-12-29T00:57:46+5:30
अपत्यप्राप्तीसाठी बहुतांश दाम्पत्यांना अनेकदा संघर्ष करावा लागतो; मात्र नियतीने ज्यांच्या झोळीत अपत्यप्राप्तीचे सुख देते त्यांच्यापैकी अनेकदा काहींना त्याचे गांभीर्य नसल्याचे विविध घटनांमधून समोर येते. शनिवारी (दि.२७) अशीच काहीसी मानवतेला कलंक ठरणारी घटना घडली.
नाशिक : अपत्यप्राप्तीसाठी बहुतांश दाम्पत्यांना अनेकदा संघर्ष करावा लागतो; मात्र नियतीने ज्यांच्या झोळीत अपत्यप्राप्तीचे सुख देते त्यांच्यापैकी अनेकदा काहींना त्याचे गांभीर्य नसल्याचे विविध घटनांमधून समोर येते. शनिवारी (दि.२७) अशीच काहीसी मानवतेला कलंक ठरणारी घटना घडली. एक बाळांतीण मातेचे नवजात शिशु तीन दिवसांनंतर दगावल्याचे लक्षात येताच त्या मातेने बाळाला बेवारस सोडून रुग्णालयातून काहीही न सांगता पोबारा केला.
जिल्हा शासकीय रुग्णालयात बुधवारी (दि.२५) मोना महेश सपाट (रा.गंगाघाट, पंचवटी) ही गर्भवती महिला प्रसूत झाली. तिने एका गोंडस नवजात बाळाला (मुलगा) जन्म दिला. हे बाळ अवघ्या २६ आठवड्यांचे जन्माला आल्याने अवघे ७०० ग्रॅम इतके वजन होते. गर्भाची नऊ महिने वाढ झाली नसल्याने बाळ अशक्त जन्माला आले. त्यामुळे जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून बाळावर योग्य ते उपचार सुरू करण्यात आले; मात्र बाळ शनिवारी उपचारादरम्यान दगावले. नवजात शिशुचा मृत्यू झाल्याचे समजताच या महिलेने त्या बाळाचा मृतदेह ताब्यात न घेत डॉक्टर, परिचारिका, सुरक्षारक्षक सगळ्यांची नजर चुकवून पळ काढला. ही बाब लक्षात येताच प्रसूती कक्षातील कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. त्यांनी सुरक्षारक्षकांसह वरिष्ठांना ही बाल निदर्शनास आणून दिली.
सुरक्षारक्षकांसह जिल्हा रुग्णालयातील पोलीस कर्मचाºयांनीदेखील महिलेचा परिसरात सर्वत्र शोध घेतला; मात्र ती मिळून आली नाही. याप्रकरणी जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासनाने पोलिसांकडे नोंद केली असून, पोलिसांनी पंचनामा पूर्ण केला. याप्रकरणी पुढील तपास सरकारवाडा पोलीस करत आहेत.