राज्यातील सत्ता जाताच भाजपच्या सदस्यत्वाला घरघर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 01:15 AM2019-12-13T01:15:02+5:302019-12-13T01:16:14+5:30
राज्यातील सत्ता गेल्यानंतर भाजपच्या सदस्य संख्येलाही ओहोटी लागली असून, नवीन सभासद करताना कार्यकर्त्यांची दमछाक होत आहे. त्यामुळे संघटनात्मक निवडणुकांना दि. २५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानंतर नाशिक शहर आणि जिल्हाध्यक्षपदासाठी निवडप्रक्रिया राबविली जाणार आहे.
नाशिक : राज्यातील सत्ता गेल्यानंतर भाजपच्या सदस्य संख्येलाही ओहोटी लागली असून, नवीन सभासद करताना कार्यकर्त्यांची दमछाक होत आहे. त्यामुळे संघटनात्मक निवडणुकांना दि. २५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानंतर नाशिक शहर आणि जिल्हाध्यक्षपदासाठी निवडप्रक्रिया राबविली जाणार आहे.
जळगाव येथे नुकत्याच झालेल्या पक्षाच्या बैठकीत संघटनात्मक निवडणुकीला मुदतवाढ देण्यात आल्याचे स्थानिक भाजपच्या सूत्रांनी सांगितले. देशात आणि राज्यात भाजपची सत्ता असताना सभासद नोंदणी मोहीम वाजत गाजत राबविण्यात आली. मिस कॉल दिल्यानंतरदेखील सभासद करून घेण्यात येत होते. त्यामुळे देशभरात भाजपचे विक्रमी सदस्य नोंदविले गेले होते. केवळ नाशिकचाच विचार केला तर शहरात पावणेपाच लाख सदस्य नोंदविले गेल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे प्रत्यक्ष नोंदणी झाल्यानंतर मिस कॉलद्वारे नोंदलेल्या सभासदांची पडताळणी केल्यानंतर ४ लाख ८५ हजार सदस्य नोंदवले गेले होते. यंदा त्यात ३० टक्केवाढीचे उद्दिष्ट देण्यात आले असले तरी सभासद वाढीसाठी प्रदेश पातळीवरूनच होणारा पाठपुरावा गतवर्षीच्या तुलनेत कमी असल्याचे दिसते आहे. स्थानिक पातळीवर प्राथमिक सभासद झाल्यानंतर सक्रिय सदस्य होण्यासाठी एकास पंचवीस याप्रमाणे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मात्र तेच अद्याप पूर्ण झाले नसल्याने बुथ प्रमुखांच्या निवडणुका रखडल्या आहेत. शहरातील बुथ प्रमुुखांच्या ८० टक्के नियुक्त्या झाल्यानंतरच मंडल प्रमुखांच्या निवडणुका घेता येतात. परंतु बुथवर पदाधिकारी म्हणून नियुक्त होण्यासाठी सक्रिय सदस्य होणे आवश्यक असते. अशा कार्यकर्त्यांची पंचवीस पंचवीस सदस्य नोंदविण्यासाठी दमछाक होत असल्याचे वृत्त आहे.
जळगाव येथे नुकत्यात झालेल्या प्रदेशाच्या बैठकीत नाशिकच नव्हे तर संपूर्ण राज्यभरात बुथनिहाय निवडणुकांसाठी दि. २५ डिसेंबर ही मुदत देण्यात आली आहे. तोपर्यंत बुथप्रमुखांच्या ८० टक्के निवडीच्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मंडल अध्यक्षांच्या निवडणुका होतील आणि त्यानंतर शहर आणि जिल्हाध्यक्षांच्या निवडीसाठी प्रक्रिया राबविली जाईल.
जिल्हाध्यक्ष निवडीला मुदतवाढ
नाशिकसह राज्यातील सर्वच शहर आणि जिल्हाध्यक्षांच्या निवडप्रक्रिया आधी दि. १० डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, नंतर त्याला मुदतवाढ देण्यात आली. तीदेखील संपली आणि आता पुन्हा दि. २५ डिसेंबरपर्यंत मंडल स्तरापर्यंतच्या निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.