गोदावरी प्रकल्पास लवकरच मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 11:34 PM2017-09-10T23:34:46+5:302017-09-11T00:11:27+5:30
उर्ध्वगोदावरी प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात येईल, अशी माहिती राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिली. पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव कालव्याच्या अपूर्ण कामांबाबत विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन मुंबई येथे बैठक झाली. यावेळी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी ही माहीती दिली.
येवला : उर्ध्वगोदावरी प्रकल्पाला लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात येईल, अशी माहिती राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिली. पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव कालव्याच्या अपूर्ण कामांबाबत विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन मुंबई येथे बैठक झाली. यावेळी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी ही माहीती दिली.
विधान परिषदेच्या पावसाळी अधिवेशनात पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव कालव्याच्या अपूर्ण कामांबाबत आमदार जयवंत जाधव यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे हा विषय मांडला होता. त्यावेळी या विषयावर बैठक लावून मार्ग काढण्याचे आश्वासन सभापतींनी दिले होते. त्यामुळे सभापतींच्या दालनात बैठक झाली. यावेळी आमदार जयवंत जाधव, लाभक्षेत्र विभागाचे प्रधान सचिव सी. ए. बिरासदार, गोदावरी मराठवाडा विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक एच. ए. ढंगारे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अधिकारी गिरीश संघानी, रमेश गावित, राजवेंद्र भट आदी उपस्थित होते. तसेच जि. प. सदस्य संजय बनकर, मोहन शेलार, सचिन कळमकर, बाळासाहेब क्षीरसागर, देविदास शेळके, आमदार छगन भुजबळ यांचे स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे, बी. आर. लोंढे आदी उपस्थित होते. सदर बैठकीत आमदार जयवंत जाधव म्हणाले की, चांदवडसह येवला या दुष्काळी तालुक्यांना जलसंजीवनी देणाºया पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव या कालव्याचे उर्वरित काम पूर्ण करण्याची गरज आहे. येवला तालुक्यातील शेतकरी पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव पाण्याची मोठ्या आतुरतेने वाट पाहत असल्याचे त्यांनी सांगितले. उर्ध्व गोदावरी प्रकल्पाअंतर्गत पुणेगाव कालवा तसेच दरसवाडी पोहोच कालवा या कामांचा समावेश आहे. सदर प्रकल्पाच्या तृतीय सुधारित प्रकल्प अहवालास लवकरात लवकर मान्यता देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. जोड उपसा क्रमांक तीनचे पाणी मांजरपाडा बोगद्याद्वारे पुणेगाव धरणात वळविण्याची त्यांनी मागणी केली. दरसवाडी धरणातील ओव्हरफ्लोच्या पाण्याद्वारे पोहोच कालव्याने चांदवड व येवला तालुक्यातील ल.पा.तलाव व पाझर तलाव बंधारे भरण्याचे मूळ प्रकल्प अहवालात नियोजन आहे. त्यामुळे ओव्हरफ्लोच्या पाण्याद्वारे सदर कालव्याची नगरसूलपर्यंत चाचणी घेण्यात यावी अशी मागणी आमदार जाधव यांनी केली. यावेळी बोलताना जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे म्हणाले की, उर्ध्व गोदावरी प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता लवकरच देण्यात येणार असून, सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर प्रकल्पातील अपूर्ण राहिलेली कामे हाती घेण्यात येतील. पुणेगावच्या लाभक्षेत्रात पुन्हा पाऊस झाल्यास चाचणीसाठी तातडीने पाणी सोडण्याचे निर्देश विजय शिवतारे यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांना दिले. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी पुणेगावसाठी अधिकचे पाणी उपलब्ध होऊ शकेल याबाबत चर्चा करण्यासाठी पुन्हा आपल्या दालनात बैठक लावण्यात येणार असल्याचे सांगितले.